Tue, Jul 23, 2019 06:58होमपेज › Kolhapur › केंद्रीय मंत्र्यांकडे साखर उद्योगाचे गार्‍हाणे

केंद्रीय मंत्र्यांकडे साखर उद्योगाचे गार्‍हाणे

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 12:12AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाचे गार्‍हाणे गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर घालण्याचा साखर कारखानदारांनी प्रयत्न केला. साखरेचा बफर स्टॉक करणे, आयात थांबवणे व निर्यातीला अनुदान देणे यासाठी केंद्रीय पातळीवर सकारात्मक विचार सुरू असल्याचे या शिष्टमंडळातील सदस्य माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

मंगळवारी खासदार राजू शेट्टी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ व जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. बाजारात साखरेचे दर गेल्या दोन महिन्यात प्रतिक्विंटल 500 ते 550 रुपयांनी उतरल्याने साखर उद्योग अडचणीत आल्याचे ना. प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढायचे असेल तर अतिरिक्त साखरेला प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच 47 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याची मागणी करण्यात आली. ना. प्रभू यांनी यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, बुधवारी खा. शेट्टी व आवाडे यांनी ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे साखर कारखानदारांच्या अडचणी मांडल्या. साखर उद्योगाच्या अडचणी या गंभीर असून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी या विभागाशी संबंधित सर्व मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची ग्वाही ना. गडकरी यांनी दिली असल्याचे आवाडे यांनी सांगितले. 

गुरुवारी ना. रामविलास पासवान यांचीही भेट घेऊन साखर उद्योगाच्या अडचणींची माहिती देण्यात येणार आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व मंत्र्यांशी समाधानकारक चर्चा होत असली तरी यावर अजून धोरणात्मक निर्णय झालेला नाही, असा निर्णय होण्यासाठी  कारखानदार व खा. शेट्टी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.