Tue, Jul 16, 2019 11:37होमपेज › Kolhapur › उतार्‍यात ‘खासगी’च भारी!

उतार्‍यात ‘खासगी’च भारी!

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : नसिम सनदी 

सहकारी साखर कारखान्यांपेक्षा निम्मे गाळप आणि साखर उत्पादन असतानाही खासगी साखर कारखान्यांनी साखर उतार्‍यात सहकारी साखर कारखान्यांवर आघाडी घेतली आहे. सहकारी कारखाने 8.30 ते 10.85 टक्के उतार्‍यात खेळत असताना, खासगी कारखान्यांनी 11 टक्क्यांवर मजल मारली आहे. 11.32 टक्के उतार्‍यासह गुरुदत्त शुगर्स कोल्हापूर विभागात प्रथम, तर दत्त-दालमिया 11.6 टक्के उतार्‍यासह दुसर्‍या स्थानावर  आहे. 

साखर उतार्‍याला साखर उद्योगात मोठे महत्त्व असल्याने अधिकाधिक उतारा मिळवण्यासाठी कारखान्यांचे नियोजन असते. आतापर्यंत यावर सहकारी साखर कारखान्यांचीच मक्तेदारी होती; पण ती आता खासगी कारखान्यांनी मोडून काढण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक उतारा मिळवणारे कारखाने म्हणून सहकारातील भोगावती, बिद्री, शाहू, जवाहर, मंडलिक, कुंभी-कासारी, दत्त-शिरोळ या कारखान्यांचा दबदबा होता.

सर्वोच्च उतार्‍यासाठीचे राष्ट्रीय पुरस्कारही हेच कारखाने मिळवत होते. आता मात्र दिवस बदलले असून, ज्याप्रमाणे खासगी कारखान्यांनी आपली संख्या तीनवरून दहापर्यंत नेली, त्याचप्रमाणे उतार्‍याच्या बाबतीतही सहकारी कारखान्यांना दरवर्षी मागे टाकले जात आहे. यामागे गाळपाचे नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. योग्य पक्वतेचा ऊस आणि कमीत कमी वेळेत गाळप झाल्याने उतारा चांगला राहिला आहे. 

सर्वाधिक उतार्‍याचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या भोगावती व बिद्रीच्या कार्यक्षेत्रातच या दोन कारखान्यांचा उतारा कमालीचा घटला आहे. भोगावतीचा अवघा 8.73 टक्के इतका नीचांकी उतारा राहिला आहे. तीच गत बिद्रीची झाली असून, सर्वाधिक उतारा व सर्वाधिक दर असा लौकिक असणार्‍या कारखान्याचा सरासरी उतारा 10.35 टक्के इतकाच राहिला आहे. शाहू कारखान्याचीही तीच परिस्थिती असून, 9.34 इतका नीचांकी उतारा राहिला आहे. वारणा, आजरा, इको केन, तांबाळे या कारखान्यांचा उतारा 10 टक्क्यांच्या आतच आहे. 

एका महिन्यातील गाळप

जिल्ह्यात 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या काळात ‘दौलत’ वगळता 22 कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली आहे. यात सहकारी 13 व खासगी 9 कारखान्यांचा समावेश आहे. हंगामाचे 18 ते 30 दिवस संपताना या कारखान्यांनी 24 लाख 68 हजार 912 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, 25 लाख 45 हजार 560 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यात 13 सहकारी साखर कारखान्यांनी सरासरी 10.21 टक्के उतार्‍याने 16.77 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 17.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचवेळी 9 खासगी कारखान्यांनी सरासरी 10.53 टक्के उतार्‍याने 7.91 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 8.33 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सहकारी कारखाने व त्यांचा उतारा 

वारणा (9.44), कुंभी-कासारी (10.15), बिद्री (10.35), भोगावती (8.73), दत्त-शिरोळ (10.7), गडहिंग्लज (10.08), शाहू (9.34), जवाहर (10.64), राजाराम (10.67), आजरा (9.3), मंडलिक (10.62), शरद (10.85),  डी. वाय. पाटील (10.72)

खासगी कारखाने व त्यांचा उतारा 

पंचगंगा (10.15), गायकवाड (10.01), तांबाळे (9.41), दालमिया (11.6), गुरुदत्त (11.32), इको केन (9.83), हेमरस (10.19), फराळे (8.57), सरसेनापती (10.56)