Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Kolhapur › साखर सहसंचालक कार्यालयास ‘टाळे’

साखर सहसंचालक कार्यालयास ‘टाळे’

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखर कारखानदारांनी पहिली उचल 2,500 रुपये केल्याच्या निषेधार्थ रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी साखर सहसंचालक कार्यालयास गनिमी कावा करीत टाळे ठोकले. अचानकपणे झालेल्या आंदोलनामुळे कार्यालयातील कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. कार्यालयातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना दमदाटी, धक्‍काबुक्‍की करीत बाहेर काढल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आंदोलकांनी कार्यालयातून पळ काढला.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेत साखर कारखानदारांची बैठक झाली. साखरेच्या दरात घसरण सुरू असल्याने त्यांनी पहिली उचल 2,500 रुपये देण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. कारखानदारांच्या या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये तीव्र पडसाद उमटले. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रघुनाथदादाप्रणीत संघटनेचे 10 ते 15 कार्यकर्ते घोषणाबाजी करीत कार्यालयात घुसले. त्यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना कार्यालयाबाहेर जाण्याच्या सूचना केल्या. काही कर्मचार्‍यांनी विरोध दर्शवल्याने शाब्दिक खडाजंगी झाली. लिपिक आर. एस. उपाध्ये यांना धक्‍काबुक्‍की केल्याने महिला कर्मचारी भयभीत झाल्या. वातावरण स्फोटक झाल्याने प्रादेशिक उपसंचालक दिग्विजय राठोड, कक्ष अधिकारी बारडे कर्मचार्‍यांसह कार्यालयाबाहेर पडले. यानंतर आंदोलकांनी प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.

आंदोलन सुरू असतानाच याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यास कळवण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील फौजफाट्यासह येत आल्याची कुणकुण लागताच आंदोलकांनी तेथून पलायन केले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून कार्यालय उघडले.

सरकारी कामात हस्तक्षेपप्रकरणी गुन्हा

दरम्यान, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांच्यासह 10 जणांवर सरकारी कामात अडथळा, धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद झालेल्यांत हणमंतराव पाटील, महादेव काटे, शंकर मोहिते, अजित पाटील, पी. आर. पाटील, बाळासाहेब मिरजे, बी. एस. पाटील आदींचा समावेश आहे. धक्‍काबुक्‍की प्रकरणाची तक्रार  लिपिक आर. एस. उपाध्ये यांनी दिली.