Sun, Apr 21, 2019 00:10होमपेज › Kolhapur › असा शिक्षक होणे नाही

असा शिक्षक होणे नाही

Published On: Sep 05 2018 11:06AM | Last Updated: Sep 05 2018 11:08AMआनंद बावणे 

ते १९६५ चे फेब्रुवारीचे दिवस होते. आम्ही सातवीत होतो, गुरुजींच्या आज्ञेमुळे सर्वजण रात्री अभ्यासाला व झोपण्यासाठी दफ्तर आणि वळकट्या घेऊन महात्मा गांधी विद्यालय क्र. ५, इचलकरंजी या पालिकेच्या शाळेत येत असू. त्या रात्री आमच्यातील दोन व्रात्य मुलांनी अभ्यास करून झोपलेल्या मुलांवर दगडे मारली. मुले खूप घाबरली. गुरुजींनी त्या व्रात्य मुलांना त्या खड्यासारखे बाजूला काढले. त्यांच्या पालकांना बोलाविले आणि पालकांसमोर छडीने बड बड बडवले! हे होते श्री वि. मा. शेळके गुरुजी. अत्यंत हुशार, शांत पण शिस्तीचे आणि मुलांनी शिकलेच पाहिजे याचा आग्रह धरणारे कर्तव्यकठोर गुरुजी. 

हे शेळके गुरुजी आम्हाला सातवीच्या वर्गाला होते. त्यावेळी प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक नसत. एकच शिक्षक जे वर्गशिक्षक म्हणून नेमलेले असत तेच सर्व विषय शिकवीत. फक्त चित्रकला, गायन आणि पिटी ( फिजिकल ट्रेनिंग अर्थात शारीरिक शिक्षण) साठी वेगळे शिक्षक असत. पालिकेच्या या शाळेत गायन शिकविले जात नसे. आठवड्यातून एक दिवस ( शनिवारी सकाळी ) शारीरिक शिक्षणाचा म्हणजे कवायतीचा तीन तासांचा कार्यक्रम असे व तो सर्व शिक्षक मिळून  शाळेच्या मैदानात एकत्रित शिकवीत. बाकी पुस्तकाशी संबंधित मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान आणि गणित हे सर्व विषय वर्गशिक्षक शिकवीत आणि आम्हाला सातवीसाठी वि. म. शेळकेगुरुजी हे वर्गशिक्षक होते व तेच सर्व विषय शिकवीत होते. ते अतिशय शिस्तप्रिय होते व त्यांच्या शिस्तीचा बडगा सर्वांना बसे. त्यामुळे आम्हा मुलांच्यात त्यांचा दरारा असे. पण गुरुजी फार प्रेमळ होते. ते उंचीला सव्वापाच फूट असतील किंवा नसतीलही. राकट गव्हाळ रंग, अंगात चौकडा किंवा लायनिंगचा बुशशर्ट, लाईट बिस्कीट किंवा ब्राऊन कलरची ढगाळ पँट, डोळ्यांना जाड काचेचा डीप ब्राऊन चष्मा, केस किंचित तेल लावून देवानंदस्टाईल मागे दुमडलेले, चौकोनी चेहऱ्यावरील ओठ किंचित विलगलेले, जसे काही कोणाला समजावून सांगत आहेत, चालताना खांदे किंचित हलवून डुलत डुलत  पण ताठ चालणे, असे त्यांचे समोरच्याला आदरयुक्त भीती दाखवणारे मध्यम पण आकर्षक व्यक्तिमत्व होते. त्यांचे शिकविणेदेखील भारदस्त होते.
सातवीच्या सर्व विषयांसाठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना चारशे पानांची एक वही सक्तीने आणावयास लावली होती व पानांना पेजिंग करावयास लावले होते. या एका वहीचे सात भाग करून प्रत्येक भागात एक विषय त्यांनी त्या विषयासाठी दिलेल्या पानांच्या संख्येप्रमाणे विभागलेला होता. चित्रकलेसाठी मात्र वेगळी वही होती. वर्गात जसजसे धडे शिकविले जातील व दिवस पुढे पुढे जातील तसतशी ही चारशे पानी वही लाल-निळी  आकार घेई. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत स्वहस्तात लिहिलेले प्रत्येक विद्यार्थ्यांचे एक गाईडच तयार होई असेच म्हणा ना! 

शेळकेगुरुजी गरीब मुलांच्यावर मनापासून प्रेम करीत. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन आस्थेने मदत करीत. पण चुकीला क्षमा करीत नसत. लहान चुकीला लहान शिक्षा आणि मोठ्या चुकीला मोठी शिक्षा ठरलेली असे. शाळा बरोबर दहा वाजता सुरु होई. आठवड्यातून दोन वेळा प्रार्थनेनंतर शेळकेगुरुजी बौद्धिक घेत. बौद्धिक म्हणजे चांगल्या पुस्तकातील एखादा परिच्छेद, एखादी लघुकथा किंवा थोरामोठ्यांची वचने सांगून त्याचा विस्तार करून चालू जगण्याशी या बौद्धिकाची सांगड घालून विषय सर्वांना समजावून सांगत. शेळकेगुरुजी सांगत तेंव्हा सर्व विद्यार्थी कान आणि डोळे उघडे ठेऊन त्यांचे बोलणे ऐकत, एवढा त्यांच्याबद्दल आदर आणि दरारा होता. वर्गाच्या वेळेत अन्य शिक्षकांशी गप्पा मारताना, चहा पिताना किंवा टाईमपास करताना त्यांना आम्ही कधीच पहिले नाही. शाळेचे आठ तास त्यांना शिकवायला आणि मुले घडवायला कमी पडत. त्यामुळे दिवाळीनंतर त्यांनी सातवीसाठी रात्रीचा आणि पहाटेचा अभ्यासवर्ग सुरु केला होता. सर्वांना रात्री जेवणानंतर आठ वाजता वर्गात दफ्तर व वळकटीसह यावे लागे. झोपण्यापूर्वी रात्री आठ ते दहा आणि पहाटे चार ते सहा सर्वांना पाठांतर कम अभ्यास करावा लागे. चारशे पानी वहीत वर्गात जे शिकवलेले होते व गुरुजींनी शॉर्टमध्ये लिहून दिले होते ते वाचणे, समजून घेणे व पाठांतर करणे असे या अभ्यासाचे स्वरूप होते. सुरुवातीचा किस्सा या रात्रीच्या अभ्यासवर्गातील होता. या रात्रशाळेमुळे वहीत असलेले सर्व मुलांना जवळजवळ पाठ झालेले असे. त्यामुळे  सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेला गुरुजींचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होत. शेळके गुरुजींचे शिकवणे किती अचूक होते हे सांगताना वर्गातील आनंदा बावणे हा विद्यार्थी सातवीच्या हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात पहिला आला होता हे अभिमानाने लिहावेसे वाटतेय. गावातील गोविंदराव हायस्कूल, इचलकरंजी हायस्कूल,

नगरपालिका शाळा नंबर एक व दोन, स्वामी विवेकानंद हायस्कूल अशा नामवंत शाळेतील हुशार मुले स्कॉलरशिप परीक्षेस बसलेली होती. मात्र शेळके गुरुजींची चारशे पानांची वही या सर्व ब्राह्मणी व हुशार शिक्षकांच्या शिकवणुकीस भारी पडली. इचलकरंजी नगरपालिकेच्या त्यावेळच्या नगराध्यक्षाकडून सन्मानपत्र स्वीकारताना त्यांना कोण आनंद झाला होता! असे होते त्यांचे शिकविणे. तो त्यावेळचा शेळके पॅटर्न होता म्हणा ना!

मुलांना फक्त पास होण्याएवढे शिकवणे शेळके गुरुजींना मान्य नव्हते. त्यांची मुले शाळेतील अन्य सर्व सांघिक कामात एकमेकांना सहकार्य करीत असत. तशी शिस्त शेळके गुरुजींनी घालून दिली होती. वर्गाची सफाई करणे, वर्ग शेणाने सारवणे, जळमटे काढणे, वर्ग सजविणे, वर्गात ढेकणाचे औषध मारणे अशी सहभाग घेऊन करावयाची कामे ते मुलांकडून करून घेत. त्यासाठी मुलांचे गट तयार केलेले असत. त्या गटाने त्या दिवशी न चुकता ते काम करायचे याकडे शेळके गुरुजींचे बारीक लक्ष असे. वर्गातील श्रीमंतांची किंवा मारवाडी शेटजींची मुले ढेकणाचे औषध मारणे किंवा जमीन शेणाने सारविणे हे काम करायला नाखूष असत. त्यांचेकडून एक-दोन रुपयांची वर्गणी घेऊन जळमटे काढणे, वर्गाची रंगीत झुरमुळ्या लावून सजावट करणे ही कामे गुरुजी करून घेत. अवघड काम म्हणजे शेणाने वर्ग सारवणे होय. या कामासाठी गुरुजींनी शेण आणण्यासाठी चौघांचा एक गट, पाणी आणण्यासाठी चौघांचा दुसरा गट, प्रत्यक्ष सारवण्यासाठी चौघांचा तिसरा गट असे गटांनी काम केले जाई. प्रत्येक कामाचे दिवस ठरलेले असत. महिन्याच्या पंधरा व तीस तारखेस वर्ग सारवण्याचा कार्यक्रम असे. त्या दिवशी गटातील मुले सोडून बाकी सर्वांना मैदानावर खेळावयास सोडले जाई. शेण आणणारी चौकडी एक मजबूत काठी आणि एक बादली घेऊन शेजारच्या विद्यार्थ्यांच्या शेतात जाई व शेण घेऊन बादलीत काठी अडकवून दोघे दोघे आळीपाळीने ती शेणाची बादली वर्गात आणीत. पाणीही तसेच आणले जाई. मुलांच्याकडून काम करून घेतले जाई, पण सोपे करून! ही गुरुजींची खासियत होती. या कामाच्या वेळी कोणास सुट्टी दिली जात नसे. पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी, एक मे, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती, बालदिन, शिक्षक दिन या दिवशी वर्ग सजावट केली जाई. गुरुजी वर्गासमोर, झेंड्याजवळ रांगोळी काढत, रंगीत झिरमिरे कागद भूमितीय आकारात कापून देत. ते दोरीला चिकटवून वर्गात उंचावर लावायचे काम स्वतःच्या देखरेखीखाली पूर्ण करीत. मुलांच्याबरोबरीने सांघिक कामामध्ये त्यांचा सहभाग नोंदवित. अशा दिवशी शास्त्रज्ञ, समाजसुधारक यांची चरित्रे मुलांना ऐकवित. विजेचा, टेलिफोनचा, लसीचा शोध कोणी लावला याबद्दल मुलांना सांगत. या मोठया व्यक्तींचे फोटो वर्गात लावलेले असत. गुरुजींना गांधीजी, सुभाषचंद्र, शाहू महाराज, आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, संत तुकाराम यांच्याबद्दल अतिशय आदर होता. त्यांचे विषय निघाल्यानंतर गुरुजी भरभरून बोलत. मुलांना सांगत की या सर्व मोठ्या लोकांचे लहानपण अत्यंत कष्टात गेलेले आहे. तरीही विद्या शिकून अडचणींवर मात करून  हे सर्व मोठे झालेत.  मुलांना वर्गात ढेकणे चावू नयेत व अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ नये म्हणून महिन्यातून एका दिवशी औषध फवारणी करून घेत. या सर्व गोष्टींमुळे कामातील बहुश्रुतपणा,  कामाची विभागणी व कष्टातील आनंद इत्यादी बाबी मुलांच्या ध्यानात आल्या. 

भारतीय घटनेचा गुरुजींना अत्यंत अभिमान होता. त्याकाळी वर्गामध्ये त्यांनी कधी जातीपातींचा विचार करून मुलांच्यात भेदभाव रुजविला नाही. तसेच देव, धर्म आणि देवाचे फोटो वर्गात लावले नाहीत. ते धर्मनिरपेक्ष व समतावादी होते. सर्वांना शिक्षण आणि कठोर शासन या तीन बाबींचा अंगीकार चांगल्या समाजासाठी आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. भूतखेत, जादूटोणा, भानामती, अंगात येणे, मांत्रीकबाजी याबद्दल त्यांच्या मनात तीव्र चीड होती. या विषयावर बोलताना त्यांना वेळेचे भान राहात नसे. अशा अंधश्रद्धा पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा मुलांवर ते खूप कठोर होते. सुरुवातीचा भानामतीचा किस्सा त्यांची विज्ञाननिष्ठता दाखवितो. त्यांना विज्ञान खूप महत्वाचे वाटे. सातवीला सामान्यज्ञान हा विषय होता . ते विज्ञान खूप तळमळीने शिकवीत. त्या दिवशी  सूर्यग्रहण होते व त्यांनी सूर्य, चंद्र पृथ्वी आणि बॅटरी ( विजेरी ) आणून मुलांना तो विषय समजावून सांगितला. ग्रहणात कोणीही शाळा चुकवायची नाही असा दम ही दिला. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर एका काचेला दिव्याची काजळी भरगच्च लाऊन सर्व मुलांना त्यांनी हे ग्रहण दाखविले. ग्रहणात बाहेर जाऊ नये, कांही खाऊ नये, ग्रहणानंतर अंघोळ करावी हे सर्व चुकीचे असून सूर्याला ग्रहण लागते म्हणजे आपण चंद्राच्या सावलीतून सूर्याला पाहतो, एवढे सोपे आहे हे त्यांनी समजावून सांगितले. मुलांनी अनेक शंका किंवा घरातील चाली सांगितल्या. गुरुजींनी त्यात काही तथ्य नाही व जुन्या लोकांना शाळेस जाता आलेले नाही म्हणून ते या चुकीच्या गोष्टी पाळतात असे सांगितले. 

त्या लहान वयात गुरुजींच्या सांगण्याचा मुलांच्या मनावर घट्ट परिणाम होत असे. आमच्या वर्गातील विनायकसुद्धा ( विनायक नारायण होगाडे. आताचे लक्षमीदत्त मंडपचे मालक श्री बापू होगाडे ) याला अपवाद नव्हता. शाळा सुटल्यावर तो घरी गेला. ग्रहण संपल्यावर घरातील सर्वांनी अंघोळी केल्या. पण विनायक अंघोळीस तयार होईना. ग्रहण ही सावली आहे व सावलीमुळे कोणाचे काही वाईट होत नाही हे वर्गात शिकविलेले तो घोकू लागला. घरातील मोठ्यांना खूप राग आला. काकू हातात झाडू घेऊन त्याला मारू लागली. यानेपण जिद्द सोडली नाही. प्रकरण प्रतिष्ठेवर गेले. शेवटी पुरुष मंडळींनी विनायकला उचलले आणि कपड्यासह न्हाणीत नेले व पाणी त्याच्या डोईवर ओतले. आपल्या विज्ञाननिष्ठेला घातलेली ही अंघोळ तो लहान मुलगा आयुष्यात कधी विसरला नाही. मात्र त्याचा स्वभाव गुरुजींसारखा आपले म्हणणे पटवून देण्याचा होता. ग्रहणाच्या दिवशी घरात परातीत तांदूळ घेऊन मुसळ उभे केले होते. विनायक दुसऱ्या दिवशी उठला. अंघोळ आटोपली व सर्वाना बोलला. आज ग्रहण नाही. तरीही मी हे मुसळ परातीत उभे करून दाखवितो. त्याने परात घेतली, मुसळ घेतले. तांदूळ घेतले,  मुसळ परातीत उभे केले, त्याभोवती तांदूळाचा ढीग केला व हळूहळू परातीत पाणी ओतू लागला. पाण्याबरोबर तांदूळ खाली घसरून मुसळाला जखडू लागले व आधाराशिवाय मुसळ परातीत उभे राहिले. घरातील सर्व बायकांना व मोठ्यांना त्याने हा चमत्कार दाखविला. सगळ्यांनी त्याच्या हुशारीचे खूप खूप कौतुक केले. 

समाजाचे आपण काही देणे लागतो व ते जाणीवपूर्वक सर्वांनी द्यावे असे त्यांना वाटे. त्यांच्या अशा विचारांमुळे व आचारांमुळे ते अन्य शिक्षकांत उठून दिसत. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी इचलकरंजीतील आपटे वाचन मंदिरात अनेक वर्षे कार्यवाह या पदाची धुरा वाहिली. नंतरच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले. मुले कॉप्या करू लागली. शेळकेगुरुजींनी आपल्या समविचारी मित्रांना बरोबर घेऊन परीक्षेच्या हॉलसमोर विद्यार्थ्यांचे कॉपी न करण्याबाबत समुपदेशन सुरु केले. त्यांचे हे आंदोलन खूप लोकप्रिय झाले. ते कृतार्थ जगले. तीन वर्षांपूर्वी ते देवाघरी गेले. मात्र आजही त्यांची एक कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय मात्र कनवाळू गुरुजी म्हणून आम्हा विद्यार्थ्यांच्या हृदयात मूर्ती विराजमान आहे .