होमपेज › Kolhapur › पोलिस चौकी, सरकारी शाळेचा अभाव

पोलिस चौकी, सरकारी शाळेचा अभाव

Published On: Jun 14 2018 8:41AM | Last Updated: Jun 14 2018 8:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहराची पश्‍चिमेकडील सीमा म्हणजे फुलेवाडी, बोंद्रेनगर. बोंद्रनगराची स्थापना माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी 1980 च्या दशकात केली. गोरगरीब कष्टकरी कामगार, शेतमजुरांना राहण्यासाठी निवारा असावा म्हणून तेथील जमीन देण्यात आली आहे. त्यावर लोकांनी घरे बांधली आहेत. महापालिका त्या घरांचा घरफाळा वसूल करून घेते, पण ती घरे लोकांच्या नावावर झालेली नाहीत. वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, खासगी सावकारी, देशी विदेशी आणि गावठी दारूचे अड्डे आहेत. नगरोत्थानच्या रस्त्यांची दुरवस्था असूून, कचर्‍याचा उठावही  होत नाही. पोलिस चौकी, सरकारी शाळेचा अभाव असेच चित्र दिसते.एकणूच नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत, या जागा मद्यपीचा अड्डा बनत आहे. यातून या परिसर गुन्हेगारी फोफावत आहे. यातून गेल्या तीन वर्षात एक खून, त्रासाला कंटाळून दोन मुलींनी केलेल्या आत्महत्या, असे प्रकार घडत आहेत. विशेषतः गुन्हेगारी रोखण्यासाठी या भागातील नागरिक पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी करत आहेत. पण, अद्यापही त्याला यश आलेले नाही. सरकारी शाळा नसल्याने कष्टकर्‍यांच्या मुलांना शाळेसाठी दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर शाळेसाठी पायपीट करावी लागल आहे. बोंद्रेनगर परिसरात बँकिंग व्यवस्था नाही. 

बोंद्रेनगर परिसरात 48 कॉलन्या, 64 तरुण मंडळे, 150 पेक्षा अधिक महिला बचत गट आहेत. 5 धरण आणि प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती आहेत. या शिवाय राधानगरी अभयारण्याच्या शेजारी गावातील नागरिकांनी जंगली प्राण्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या जमिनी शासनाला परत करुन त्यांतून मिळालेले पैसे घेऊन जी कुटूंब शहराकडे आली आहेत, त्यातील अनेक कुटूंबे, बोंद्रनगर धनगरवाडा या परिसरात स्थायिक झाली आहेत.  हे लोक गरीब आहेत, दिवसभर काम केल्याशिवाय रात्रीची चूल पेटत नाही, अशी या कुटुंबांची परिस्थिती आहे. 

या भागात महापालिकेची शाळा नाही, खासगी शाळांच्या बसेस मात्र या भागातून सुसाट सुटत असतात. पण, गरिबांच्या मुलांना शाळेसाठी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर फुलेवाडीत यावे लागते. तसेच खासगी दवाखाने खूप आहेत, पण सरकारी दवाखाना नाही, त्यामुळे गरीब रुग्णांची मोठी कुंचबना होत आहे. 

समस्येच्या गर्तेत उपनगरे : बोंद्रेनगर परिसर
गावठी अड्डे, पोलिसांचे दुर्लक्ष, 

या भागात गावठी दारूचे अड्डे अनेक ठिकाणी आहेत. काही ठिकाणी तर राजरोस गावठी दारू विकली जाते. विदेशीही विक्री केली जाते. पण, पोलिसांचे  दुर्लक्ष होत आहे. अलीकडील काही वर्षात हा भाग खून, मारामार्‍या, महिला, मुलींच्या टिंगलटवाळीचे प्रकार घडत आहेत. यातून सामान्य माणसांना न्याय मिळावा, यासाठी या भागात पोलिस चौकीची मागणी होत आहे. यासाठी आश्‍वासनांचा पाऊस पाडला जात आहे. पण, अद्यापही पोलिस चौकी झालेली नाही.

या भागात पाणी, विजेची चांगली सुविधा आहे, पण आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण करण्यासाठी बँकेची सुविधा नाही. पोलिस चौकीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. शासकीय रुग्णालय नाही, फुलेवाडी नाक्यापासून सुरू झालेला मुख्य रिंगरोड आहे, त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते भरून घेण्याची गरज आहे. 

    -  विजय कापसे, किराणा दुकानदार

या भागात नगरोत्थानची अनेक कामे अपुरी आहेत. नगरोत्थानमधून जो रिंगरोड करण्यात आला आहे. हा रस्ता एक वर्षातच ठिकठिकाणी उघडला आहे. खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. या भागात जोरात पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची दैना उडण्याची शक्यता आहे. पोलिस चौकीची अनेक दिवसांची मागणी आहे, ती पूर्ण झालेली नाही. ओपन जीम नाही. मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. अशी अनेक विकासकामे या भागात प्रलंबित आहेत. 

- विजयसिंह देसाई, सामाजिक कार्यकर्ते

या भागात सेवानिवृत्तीनंतर जागा घेऊन घरे बांधून राहिलेले अनेक कर्मचारी आहेत, अशा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना विरंगुळा मिळावा, यासाठी या भागात विरंगुळा केंद्राची गरज आहे.    

 - कृष्णा सुतार