कोल्हापूर : प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट व डाटा अॅनिलेटिक्स यामुळे जगात दर क्षणाला बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी खासगी आयुष्य व करिअर यांचे संतुलन राखण्याबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी केले.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शनिवारी (दि. 28) स्नेहमेळावा झाला. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी डॉ. योगेश जाधव यांचा रजनीताई मगदूम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. योगेश जाधव म्हणाले, तरुणांमधील अफाट ऊर्जा, सळसळते चैतन्य नेहमीच आशादायी वाटत असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे आवडते. ब्रिक्झीट, अमेरिकन निवडणूक या जगातील प्रभावशाली घटनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. आतापर्यंतच्या क्रांती ही चाकाचा शोध, मशिनरी व संगणक यामुळे झाल्या. नव्या युगात इंटरनेटच्या रुपाने नवी क्रांती झाली आहे. याचा विद्यार्थ्यांनी करिअर करताना विचार केला पाहिजे, असे डॉ. जाधव म्हणाले.
पूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय व वाणिज्य क्षेत्र महत्त्वाचे होते, असे सांगून डॉ. जाधव पुढे म्हणाले, शिक्षणाची बहुसंख्य क्षेत्रे वाढली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअर करताना बारकाईने विचार करणे गरजेचे आहे. आता प्रत्येक अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया राबविल्या जात आहेत. अलीकडील काळात प्रवेश परीक्षा देऊन पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. संवाद कौशल्ये, नाविण्यपूर्णता या गोष्टी पुस्तकातून मिळणार नाहीत. यासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत.
2030 साली भारत हा जगातील सर्वात तरुण देश होणार आहे. 65 टक्के लोक हे 35 वयोगटातील असतील. सरासरी आयुर्मान 29 असणार आहे. एका स्वीडिश कंपनीने एलईडी बल्बमधून डाटा ट्रान्स्फरची प्रणाली विकसित केली. पुढील काळात ती भारतात यायला वेळ लागणार नाही. पूर्वीप्रमाणे वडिलोपार्जित व्यवसाय चालणार नाहीत. अशा बदलत्या काळात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायम अपडेट राहिले पाहिजे.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, आयुष्याच्या वळणावर उच्च पदावर गेल्यानंतर शाळा व महाविद्यालयांची आठवण येते. डॉ. जाधव यांची उर्वरित वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रंकाळ्याची पाहणी केली आहे. कोल्हापुरात मैदान, उद्याने यासह स्मशानभूमी यासारखे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी जास्तीत-जास्त निधी द्यावा. तसेच शहरातील विकासाचा त्यांनी आराखडा तयार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
न्या. राजेंद्र माजगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेतले पाहिजे. भूतकाळ न विसरता वर्तमानात जगणेे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी भविष्याबाबतचे व्हिजन ठेवून करिअरचे उच्च ध्येय गाठावे. जीवनाचे मार्गक्रमण करताना वाईट संगत चुकवून पुढे गेल्यास यश निश्चित मिळते, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष प्रसाद कामत म्हणाले, प्रत्येक मोठ्या गोष्टीच्या यशामागे अथक परिश्रम व त्याग भावना असते. डॉ. योगेश जाधव यांच्यावर सरकारने महामंडळाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी टाकली आहे. ते महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन घेऊन कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवितील. त्यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाल्यास कोल्हापूरसह या भागास चांगले दिवस येतील.
याप्रसंगी आ. क्षीरसागर यांनी पाच लाख रुपयांचा निधी महाविद्यालयास दिला. यावेळी रोटरी क्लबच्या शाहू ब्लड बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात 39 जणांनी रक्तदान केले. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रमोद जगताप यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी सीबीआयचे स्पेशल न्यायाधीश जयेंद्र जगदाळे, पालघरचे जिल्हा न्यायाधीश राजेंद्र माजगावकर, खारघरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, नागपूरचे पोलिस उपअधीक्षक विजय पळसुले, दिग्दर्शक, लेखक नितीन कुलकर्णी, संस्थेचे सचिव अॅड. व्ही. एन. पाटील, संचालक रवींद्र खेडेकर, मदन कारेकर,अनिरुद्ध भुरके, मनोज वाधवानी, राजू गवळी, विद्यार्थी प्रतिनिधी स्वरुप तेली यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.