Fri, May 24, 2019 08:28होमपेज › Kolhapur › विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशाविनाच

विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशाविनाच

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

मोफत गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एकही विद्यार्थी पहिल्या दिवशी गणवेशात दिसला नाही. दुसरीकडे योजनेसाठी सरकारकडून 16 कोटी रुपयांची गरज असली तरी प्रत्यक्षात मात्र एक रुपयादेखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही.

सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश मोफत दिले जातात. एका गणवेशासाठी दोनशे रुपये याप्रमाणे दोन गणवेशासाठी सहाशे रुपये दिले जातात. यावर्षी मात्र शंभर रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दोन गणवेशांसाठी सहाशे रुपये मिळणार आहेत. पण, ते कधी मिळणार याबाबत मात्र साशंकता आहे. गेल्या वर्षी दोन लाख 47 हजार विद्यार्थी मोफत गणवेशाचे लाभार्थी होते. यावर्षीही तेवढेच लाभार्थी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांनी आधी गणवेश खरेदी करून खरेदीच्या पावत्या मुख्याध्यापकांकडे सादर केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर सहाशे रुपये जमा होणार आहेत. बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करून न दिल्याने शुक्रवारी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत आले होते. 

ग्रामीण भागात राहणार्‍या पालकांच्या खिशात आधी गणवेश खरेदी करून देण्यासाठी सहाशे रुपये असणे आवश्यक आहे. पैशांची जमवाजमव केली तरी बँकेत खाते उघडण्यास अधिकार्‍यांकडून अडथळा आणला जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जवळपास 22 हजार विद्यार्थ्यांचे बँकेत खातेच उघडले गेले नाही. दुसरीकडे बँक खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी ती आधी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त होणे गरजेचे आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही सरकारने ही रक्कम अद्याप वितरित केली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्याही मार्गदर्शक सूचनाही प्राप्त झालेल्या नसल्याने अधिकारी हातावर हात धरून बसले आहेत.