Wed, Jul 17, 2019 20:23होमपेज › Kolhapur › विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांची धूम

विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांची धूम

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:48AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या कॉलेज सचिवपदासाठी (जनरल सेक्रेटरी) निवडणुका बुधवारी झाल्या. अनेक कॉलेजवर बिनविरोध निवडी, तर काही ठिकाणी वर्गप्रतिनिधींच्या (सीआर) मतदानाद्वारे निवडणूक झाली. निवडीनंतर सर्वच कॉलेजवर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या निवडणुकीत काही उमेदवार हे तालीम, संस्था तसेच राजकीय नेत्यांचे समर्थक असल्याने अनेक कॅम्पसमध्ये मिरवणुका काढण्यात आल्या. निवडणुकीचे मतदान पसंतीक्रम पद्धतीनुसार झाले. त्यामुळे काही ठिकाणी मतमोजणीस विलंब दिसून आला. 

बुधवारी सकाळपासून सर्व कॉलेजमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. निवडणुका असल्याने दक्षता म्हणून सर्व कॉलेज परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  अर्ज भरणे, छाननी, उमेदवारांची घोषणा आणि उमेदवारांकडून प्रचार यानंतर प्रत्यक्ष मतदान अशी प्रक्रिया झाली. दुपारी एक वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.  विजयी उमेदवारांमध्ये अनेक जण तालीम संस्था आणि मंडळांशी संबंधित असल्याने निवडीनंतर संबंधित भागात जल्लोषी मिरवणुका निघाल्या. 

शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्रविद्या अधिविभागाचा सचिव

शिवाजी विद्यापीठातील 46 अधिविभागांतून सचिवपदासाठी अत्यंत चुरशीने निवडणूक झाली. एकूण दहा उमेदवारांनी अर्ज भरले होते. यापैकी तिघांचे अर्ज छाननीत बाद झाले. तर दोघांनी माघार घेतली. अखेर  पाच जणांत निवडणूक झाली. चाळीस मतदारांनी मतदान केले. यातून वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाचा विद्यार्थी सुनील बिरेदार याने एकवीस मते मिळवत बाजी मारली. निवडीनंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

विवेकानंद कॉलेज : अक्षय पाटीलची बाजी

विवेकानंद कॉलेजमध्येही जीएसपदासाठी चुरशीने निवडणूक झाली. या निवडणुकीत अक्षय प्रकाश पाटील (बी.ए. भाग-3) याने बाजी मारली. अक्षयला 21 मते, तर प्रतिस्पर्धी उमेदवार  शिवानी पाटील 13 व कोमल पाटीलला 2 मते मिळाली. 

कॉमर्स कॉलेज : स्वरूप तेली बिनविरोध

कॉमर्स कॉलेजमध्ये स्वरूप नंदकुमार तेली या विद्यार्थ्याची जीएसपदी बिनविरोध निवड झाली. दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता; मात्र माघारीनंतर बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. स्वरूप हा दिलबहार तालमीचा कार्यकर्ता आहे.

राजाराम कॉलेज : जीएसपदी मैथिली आर्वे
राजाराम कॉलेजच्या जीएसपदासाठी मैथिली आर्वे आणि सृष्टी नलवडे यांच्यात  थेट लढत झाली. आर्वे हिला 11, तर नलवडे हिला 4 मते मिळाली. 

कमला कॉलेज : किशोरी  पसारे 
कमला कॉलेजमध्ये किशोरी राजू पसारे (एमए भाग-2) हिची जीएसपदी निवड झाली. किशोरी व तारा दिवेकर यांच्यात निवडणूक झाली. किशोरीला 12, तर तारा हिला 9 मते मिळाली. 

न्यू कॉलेज : अभिषेक श्रीराम 
न्यू कॉलेजमध्ये अभिषेक श्रीराम या विद्यार्थ्यास 14 मते मिळून विजयी ठरला. निवडीनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष करून विजय साजरा केला. 

महावीर कॉलेज : अशफाक शिकलगार
महावीर कॉलेजमध्ये अशफाक हसन शिकलगार याने 10 मते मिळवून विजय मिळवला. प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल सुहास पाटील हिला 9 मते मिळाली. एका मताने अशफाक विजयी झाला. 

शहाजी कॉलेज : ओंकार पाटील
शहाजी कॉलेजमध्ये ओंकार सुरेश पाटील (बीए भाग-3) याची सचिवपदी बिनविरोध झाली. विद्यापीठ प्रतिनिधीपदी अमित राजेश चव्हाण याची निवड झाली. 

शहाजी लॉ कॉलेज : झुबेर मकानदार
शहाजी लॉ कॉलेजमध्ये झुबेर मकानदार विजयी झाला. त्याला 6 मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन बोभाटेला 4 व धनश्री पाटीलला 3 मते मिळाली. 

केआयटी : सौरभ अदाटे 
केआयटीमध्ये सौरभ अदाटे विजयी ठरला. निवडणूक बिनविरोध झाली.

डी. डी. शिंदे कॉलेज : मुजफ्फर बाणदार
डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये मुजफ्फर बाळासाहेब बाणदार  याची निवड झाली. 

शाहू कॉलेज : रुबिना मुल्‍ला 
शाहू कॉलेजमध्ये रुबिना बशीर मुल्ला (बीए-3) हिचा बिनविरोध विजय झाला.