होमपेज › Kolhapur › छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 1:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाडिक कॉलनीतील हुमेरा रफिक मुल्‍लाणी (वय 13) या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्याने रेहान याकूब मुजावर (वय 20) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी रफिक मुल्‍लाणी रिक्षाचालक आहेत. त्यांची मुलगी हुमेरा इयत्ता नववीत शिकत होती. शुक्रवारी सायंकाळी ती शाळेतून घरी आली. घराच्या पोटमाळ्यावर गेली. बराच वेळ ती खाली न आल्याने पालकांनी पोटमाळ्यावर पाहिले असता तिने ओढणीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

संशयित रेहान मुजावर हा हुमेराचा वारंवार पाठलाग करत होता. रात्री-अपरात्री हुमेराच्या चुलत्याच्या फोनवर फोन करायचा. दीड महिन्यापूर्वी त्याने बळजबरीने तिला रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला होता, असेही पालकांनी सांगितले. या त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली.