Sat, Jul 20, 2019 15:51होमपेज › Kolhapur › सरस्वतीच्या लेकरांचा ‘भाकरी’साठी आक्रोश!

सरस्वतीच्या लेकरांचा ‘भाकरी’साठी आक्रोश!

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 09 2018 12:33PMकोल्हापूर : सुनील कदम

केंद्र आणि राज्य शासनाने नोकर भरतीवर मर्यादा आणून नोकर कपातीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. ‘चाकरी आणि भाकरीच्या शोधात’ वैफल्यग्रस्त झालेल्या अशा विद्यार्थ्यांच्या चर्चेतून जणू काही ही पिढी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे जाणीव होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा देण्याची गरज आहे. 

शिकून सवरून पोरांनी नशीब काढावे, आपण केलेल्या काबाड कष्टाचे पांग फेडावेत, ही सर्वसाधारणत: कोणत्याही पालकांची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे चांगले शिकून शासकीय नोकरीत जावे, सुखासीन आयुष्य जगावे अशी सर्वसाधारणत: तरुण पिढीची अपेक्षा असते, किंबहुना तेच त्यांनी आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय मानलेले असते आणि त्याद‍ृष्टीने त्यांची तयारी सुरू असते. सरकारी नोकरीत दाखल व्हायचा एक प्रमुख राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा, ही अडथळ्याची शर्यत एकदा का आपण पार केली की आपण आपले ध्येय साध्य केलेच, अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळेच राज्यात आजमितीला जवळपास 10 लाखांहून अधिक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात. केंद्र अथवा राज्य पातळीवरील  कोणत्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप विचारात घेता सहजासहजी आणि एक-दोन वर्षांत साध्य होणारी ही गोष्ट नाही, हे सहज लक्षात येते. किमान तीन-चार वर्षांपासून आठ-दहा वर्षे रात्रंदिवस घाम गाळावा, प्रचंड प्रमाणात अभ्यास करावा, तेव्हा कुठे ते ध्येय साध्य होते. मात्र, आपल्या ध्येयपूर्तीच्या आकांक्षेने झपाटलेले लाखो तरुण आणि तरुणी या कशाचीही फिकीर न करता स्पर्धा परीक्षेसाठीचे हे कष्ट वर्षानुवर्षे उपसताना दिसत आहेत.

संबंधित : 

पात्रता ‘आचार्या’ची, शासनकृपेने झाला ‘आचारी’!

मध्यप्रदेशच्या ‘व्यापम’ची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?

परीक्षार्थींच्या वाट्याला सामाजिक हेटाळणी!

आज केंद्र शासनाच्या सेवेतील 4 लाख 20 हजार आणि राज्य शासनाच्या सेवेतील 1 लाख 77 हजार वेगवेगळ्या पातळीवरील पदे रिक्‍त आहेत. आज ना उद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही पदे भरली जातील आणि त्यातच कुठेतरी आपल्या नशिबाची दारे उघडतील म्हणून राज्यातील हे दहा लाखांवर तरुण वर्षानुवर्षे आपले नशीब आजमावत आहेत, तर काही आजमावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे राज्यातील या लाखो तरुण-तरुणींच्या ध्येयावर पाणी फिरण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जवळपास 30 टक्के शासकीय पदे म्हणजे नोकर्‍या कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कपात केलेली पदे सोडून राहिलेली रिक्‍त पदेसुद्धा भरण्याचा शासनाचा मानस दिसत नाही. तातडीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्याकडे शासनाचा कल दिसत आहे. त्यामुळे शासकीय नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या आणि त्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट उपसणार्‍या स्पर्धा परीक्षार्थींच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकू लागले आहेत. आपल्या काळ्याकुट्ट भवितव्याच्या चाहुलीमुळे हा सगळा वर्ग पुरता भेदरून गेलेला दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्यात प्रचंड नैराश्याची भावना दाटून आल्याचे दिसत आहे. शासनाने गांभीर्याने या वर्गाचा विचार केला नाही तर त्यांच्या नैराश्याला भलतीकडेच वाटा फुटण्याचा धोका दिसत आहे.

 आयुष्याची माती करू नका!

स्पर्धा परीक्षार्थी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे आपले ध्येय साध्य करण्यासाठी खर्ची घालत आहेत. ते ध्येयपूर्तीच्या टप्प्यावर असतानाच जर शासनाने नोकर कपात अथवा नोकर भरती बंदीसारखे निर्णय घेतले तर या युवकांच्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून रिक्‍त पदे भरावीत, अन्यथा या युवकांच्या मनातील असंतोषाचा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही.

- गिरीश फोंडे, ऑल इंडिया युथ फेडरेशन