Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Kolhapur › पालिका इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

पालिका इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:00AM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

कागल नगरपालिका इमारतीला लागलेल्या आगीमुळे काही धोका आहे काय? यासाठी नगरपालिकेने सांगली येथील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. या ऑडिटमध्ये इमारतीला कोणताही धोका पोहोचला नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

नगरपालिकेच्या इमारतीमधील दुसर्‍या मजल्यावरील बांधकाम, आरोग्य, भांडारपाल आणि सुवर्ण जयंती योजनांच्या कार्यालयांना दि. 11 नोव्हेंबर 2017 रोजी मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीचा तपास कागल पोलिस करीत आहेत. महिना झाला तरी अद्याप पोलिसांचा तपास सुरूच आहे. या तपासासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नक्की तपास कुठेपर्यंत आला आहे याची ठोस माहिती अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. 

आगीमुळे इमारतीला कोणत्या प्रकारचा धोका निर्माण झाला आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी नगरपालिकेने सांगली येथील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला स्ट्रक्चरल ऑडिट करावे यासाठी दि. 15 नोव्हेंबर रोजी विनंती केली होती. त्यानुसार कॉलेजच्या तीन तज्ज्ञांच्या पथकाने दि. 17 नोंव्हेबर रोजी पालिकेच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली या पाहणीत अत्याधुनिक मशीनद्वारे विविध प्रकारच्या टेस्ट घेण्यात आल्या. इमारतीच्या छताच्या स्लॅबला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. काँक्रीटचा दर्जा अतिशय चांगला आहे. कॉलमना धोका पोहोचला नसल्याचे दिसून येते असून, इमारतीच्या स्ट्रक्चरल बाबींना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचले नसल्याचे ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे.