Fri, Jul 19, 2019 07:24होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच

महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:17AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सौ. हसिना फरास यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील इच्छुकांनी महापौरपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. स्वाती यवलुजे यांच्यासह उमा बनछोडे व दीपा मगदूम यांच्यात चुरस आहे. सर्वांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. नाव निश्‍चितीसाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे रविवारी नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापौर निवडणूक 22 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. 

पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. सुरुवातीचे अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या होत्या. आता महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. काँग्रेसमधील नूतन महापौरांना 15 मेपर्यंतचा कालावधी मिळणार आहे. महापौरपदासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने अद्याप कुणाचेही नाव स्पष्ट झालेले नाही. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत.

पाटील हे उपमहापौर झाल्यास गटनेतेपदी इतर नगरसेवकाची नियुक्‍ती करावी लागणार आहे. मात्र, सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हेच महापौर व उपमहपौरपदाचे नाव अंतिम करणार आहेत.

विरोध मोडून ४६ केबीन हटविल्या

कोल्हापूर : प्रतिनिधी
केबीनधारकांचा ठिकठिकाणी होणारा विरोध मोडून काढून अतिक्रमण विभागाच्या वतीने ताराराणी विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील विनापरवाना तब्बल 46 केबीन हटविण्यात आल्या. विरोधामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. केबीन्सबरोबरच विनापरवाना 5 शेड, डिजिटल बोर्ड 6, छोटे बोर्ड व हातगाड्या 125 हटविण्यात आल्या. छत्रपती ताराराणी चौक ते  एलिगंट हॉटेल, रेल्वे उड्डाणपूल ते ताराराणी चौक, सासणे मैदान परिसर व वायल्डर मेमोरियल चर्च ते ट्रेडसेंटर येथील रस्त्यावरील व फुटपाथवरील विनापरवाना नियमबाह्य अतिक्रमणे काढण्यात आली. 
मोहिमेसाठी 70 कर्मचारी, जेसीबी-2, ट्रॅक्टर ट्राली-2, डंपर-3, लाईट बूम, कटर वेल्डिंग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती. कारवाईवेळी शाहूपुरी पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्‍निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे.