Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Kolhapur › शालिनी स्टुडिओ जागेबाबत शासन निर्णयाला हरताळ

शालिनी स्टुडिओ जागेबाबत शासन निर्णयाला हरताळ

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:29AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

राज्य शासनाने 2005 साली शालिनी स्टुडिओमधील भूखंड क्र.  5 व 6 ही जागा स्टुडिओसाठी राखीव ठेवण्यात असल्याचे जाहीर केले; पण या शासन निर्णयाला  हरताळ फासण्याचे काम  महापालिकेतील काही कारभारी नगरसेवक करत आहेत.    

चित्रपट व्यवसायाचा शतक महोत्सव साजरा होत असताना कोल्हापूरच्या  चित्रपटनिर्मितीची उज्वल परंपरा सांगणार्‍या जयप्रभा व शालिनी स्टुडिओचे अस्तित्व आज राहिले नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. जुन्या कलाकारांच्या आठवणींचा ठेवा देखील आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही, याची खंत  मराठी कलावंत व तंत्रज्ञांना आहे.  

1934 साली शालिनी स्टुडिओ उभारणी झाली.  स्टुडिओमध्ये व्ही.शांताराम, आनंद माने, भालजी पेंढारकर, आनंद माने ते महेश कोठारे यांंच्यापर्यंत अनेकांनी चित्रपट निर्मिती केली.  पण नंतर चित्रीकरण कमी होऊ लागले. त्यामुळे या जागेची विक्री करण्याचा निर्णय झाला. स्टुडिओच्या जागेवर असणारे बांधकाम पाडताना पाहून कलाकार व तंत्रज्ञांना अश्रू अनावर झाले होते. कलाप्रेमी जनतेने सर्वच जागा विकली किमान दोन भूखंडांचे अस्तित्व कायम ठेवावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली. 

शासनाने 22 मार्च 2005 साली याबाबतची माहिती महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष यशवंत भालकर यांना पत्राद्वारे कळवली आहे. त्यानंतर महामंडळाने   चित्रीकरणासाठी जागा आरक्षणाबाबतचा फलक लावला होता. पण तरीही काही कारभारी नगरसेवकांनी या जागेची ‘सुपारी’ घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच महासभेत या ठरावावर चर्चा देखील होऊ दिली नाही. 

एका नगरसेवकाने यासाठी पद्धतशीर काहींना ‘मॅनेज’ केले. त्यामुळे शालिनी स्टुडिओची जागा आरक्षित ठेवण्याचा ऑफिस प्रस्ताव आला तरी त्यावर चर्चा होऊ नये, याची खबरदारी घेत हा प्रस्ताव नामंजूर होईल यासाठी प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले.

शाहू महाराज, राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आपली जमीन दिली. त्याच कोल्हापुरात या महापुरुषांची नावे घेऊन काम करणार्‍यांनी सुपारी कशाची फोडायची याचे तरी भान ठेवावे, असा सल्ला कारभारी नगरसेवकांना  कलाप्रेमींनी दिला आहे.