Tue, Jul 16, 2019 10:05होमपेज › Kolhapur › तणावपूर्ण शांतता

तणावपूर्ण शांतता

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 04 2018 8:50PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदने कोल्हापुरात हिंसक वळण घेतले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर निघालेला मोर्चा, त्यास विरोध दर्शवण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी काढलेला प्रतिमोर्चा, दोन्हींकडून झालेली हुल्‍लडबाजी आणि यातून निर्माण झालेली दगडफेक, तोडफोड, लाठीहल्‍ला यामुळे संपूर्ण शहर दहशतीच्या छायेखाली होते. बुधवारी दिवसभर सुरू असलेला गोंधळ सायंकाळनंतर कमी झाला; मात्र या संघर्ष आणि तोडफोडीचे परिणाम गुरुवारी जाणवले. दिवसभर शासकीय कार्यालये, हॉटेल, शाळा-महाविद्यालये, छोटे-मोठे व्यवसाय या ठिकाणी तणावपूर्ण शांतता दिसत होती. 

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी स्वयंस्फूर्तीनेच दुकाने, शाळा, हातगाडे, हॉटेल्स, रिक्षा आदी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी फिरून खुली असणारी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले; मात्र काहींनी हुल्लडबाजी करत दगडफेक व तोडफोड करण्यास सुरुवात केली. खुल्या दुकानांबरोबरच बंद असणार्‍या दुकानांवरही नाहक दगडफेक केली. घराच्या दरात, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची प्रचंड तोडफोड केली.

स्थानिक लोकांबरोबरच बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांनाही याचा चांगलाच फटका बसला. यामुळे संतप्त व्यापारी व हिंदुत्ववादी संघटनाही रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही शहरभर प्रतिमोर्चा काढून तोडफोड, दगडफेक केली. यामुळे संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला. दोन्ही गट एकमेकांना भिडले. यात अनेक जण जखमी झाले. यात दोन्हींकडील तरुणांसह पोलिस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश होता. मोर्चाला लागलेल्या हुल्लडबाजीच्या गालबोटामुळे दिवसभर शहर तणावाखालीच होते. पोलिसांनी लाठीमार करून दोन्हींकडील जमावांना पांगविले आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

कोल्हापूर बंदच्या घोषणेचा परिणाम

बुधवारी सायंकाळनंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती; मात्र जमावबंदीचा आदेश लागू झाल्याने हा बंद मागे घेण्यात आला. तरीही गुरुवारच्या कोल्हापूर बंदबाबत सोशल मीडियावरून वेगवेगळी माहिती प्रसारित होत होती. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील नागरिक, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, छोटी-मोठी दुकाने यांना धाकधूक लागून राहिली होती.

सकाळी लवकर सुरू होणारी दुकाने दहा-अकरा वाजल्यानंतर सुरू झाली. प्रत्येक दुकान हे खात्री करून उघडले जात होते. शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या अनेक रिक्षांनी आज पालकांनाच त्यांच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत सोडण्याच्या सूचना दिल्या. यामुळे बहुतांश पालकांनी मुलांना शाळेत सोडलेच नाही. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती. बंदसद‍ृश वातावरणामुळे आसपासच्या खेडेगावांतून येणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सुटी घेणे पसंद केले.