Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Kolhapur › ‘कर्जमाफी’चा सेवा संस्थांवर पडतोय ताण

‘कर्जमाफी’चा सेवा संस्थांवर पडतोय ताण

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:09AM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीचा अद्यापही सावळा गोंधळ सुरूच आहे. या कर्जमाफीमध्ये शेतकर्‍यांना समाधानकारक लाभ मिळालाच नाही, याची खंत असतानाच कर्जमाफीचे कागदपत्रे गोळा करणे, याद्या तयार करणे, ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरणे, याद्या डाऊनलोड करणे, यादीतील नावे संगणकावर घेणे, शेकडो पानांचे झेरॉक्स मारणे, बँक आणि शासकीय कार्यालयांना माहिती देण्यासाठी सेेवा संस्थांना संस्थेच्या वसुलामधून खर्च करावा लागला. त्यामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड संस्थांना बसला आहे. तोट्यात असलेल्या सेवा संस्थांच्या तोट्यात आता अधिकच भर पडली आहे. कागल तालुक्यात 164 सेवा संस्था आहेत.  

या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यात येत होते. त्यानंतर ते ऑफलाईन घेण्यात आले. यासाठी येणारा खर्च काही ठिकाणी संस्थांनी केला तर काही ठिकाणी व्यक्तिगत शेतकर्‍यांनी केला. यामध्ये देखील महा-ई-सेवा केंद्र आणि शासनाच्या इतर सेवांमधून एक अर्ज भरण्यासाठी दोनशे रुपयांचा दर लावण्यात आला होता. काही कार्यालयांना तीन ते चार याद्या तयार करून द्याव्या लागल्या आहेत.