Fri, Jan 18, 2019 00:38होमपेज › Kolhapur › आरक्षणासाठी रास्ता रोको, गोदावरीत आंदोलन

आरक्षणासाठी रास्ता रोको, गोदावरीत आंदोलन

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 28 2018 12:53AMबीड : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी शनिवारीही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे मराठा समाजबांधवांनी गोदावरीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी जिल्ह्यातील आडस, परळी, लहामेवाडी, हिवरसिंगा, पुरुषोत्तमपुरी, सावळेश्‍वर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.  दरम्यान, आरक्षणासाठी आज रविवारी पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

गुन्हे मागे घेण्यासाठी परळीत रास्ता रोको

परळी :  मराठा क्रांती ठोक मोर्चाला व्यापक स्वरूप आलेले आहे. ठिक ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अनेकांवर  गुन्हे दाखल झाले आहेत. हे आंदोलन आमच्या न्याय हक्कांसाठी असल्याने मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत यासाठी शनिवारी सकाळी 11.30 दरम्यान  छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे महिलांनी रास्ता रोको केला. परळी शहर आणि तालुक्यातील मराठा समाजाच्या महिलांनी घोषणा देत रास्ता रोको केला. हातात पोळ्या लाटायचे लाटणे घेऊन त्यांनी आंदोलन केले. 

गोदावरी पात्रात जल आंदोलन 

माजलगाव :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी तरुणांनी जल आंदोलन केले. या आंदोलनात काही अनुचित  होऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारीच्या  उपाययोजना केल्या होत्या. 

  आंदोलकांनी प्रशासनास गोदावरी नदीच्या पात्रात जल आंदोलन करण्याचा  इशारा दिला होता. आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता गोदावरी पाण्यात उतरत आंदोलन केले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना   श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रशासनाने फक्त 10 आंदोलनकर्त्यांना जल आंदोलनासाठी पाण्यात जाण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार  10 आंदोलक पाण्यात उतरले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीत आंदोलकांभोवती होड्यांचा कडे केले होते. त्या ठिकाणी होड्यांमध्ये पोहण्यात तरबेज असलेल्या पोलिसांसह काही युवकही सज्ज ठेवण्यात आले होते