Thu, Apr 25, 2019 07:32होमपेज › Kolhapur › सांडपाणी प्रक्रिया बंद; अधिभार सुरूच

सांडपाणी प्रक्रिया बंद; अधिभार सुरूच

Published On: Dec 17 2017 1:29AM | Last Updated: Dec 16 2017 11:50PM

बुकमार्क करा

कसबा बावडा : प्रतिनिधी

शहरातील नाल्यांमधील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट पंचगंगेत मिसळत आहे. मात्र, शहरवासीयांच्या पाणी बिलात सांडपाणी अधिभार सुरू आहे. महानगरपालिका शहरातील  सुमारे एक लाख पाणी कनेक्शन धारकांकडून सुमारे 7 कोटी रुपयांचा अधिभार गोळा करते. सांडपाणी प्रक्रिया बंद मात्र अधिभार सुरू अशी सद्यस्थिती आहे. नियमित पाणी बिल भरणार्‍यांची ही लूटच आहे.

कोल्हापूर शहरातील 12 प्रमुख नाल्यांचे पाणी वेगवेगळ्या मार्गाने पंचगंगा नदीत मिसळत होते. यातील जयंती नाल्यावर उपसा केलेले पाणी लाईनबाजार प्रक्रिया केंद्रात आणले जात होते. सन 2014 मध्ये लाईन बाजारात तर सध्या दुधाळीवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. पण प्रक्रियेनंतरचे पाणी नदीत मिसळता कामा नये याची दक्षता घेण्याबाबतची सूचना पाळण्यात आलेली नाही. इतर कारणांसाठी हे पाणी उपलब्ध करून पुढे नदी प्रदूषण टाळण्यासाठी सूचना आहेत; पण महानगरपालिकेला याचे गांभीर्य नाही. लाईन बाजार येथील सांडपाणी प्रक्रिया फक्त शहरातील काही अंशी सांडपाण्यावर प्रक्रिया करत होते. गेल्या सहा महिन्यापासून तेही बंद आहे; पण सांडपाणी प्रक्रिया अधिभार मात्र सुरूच आहे. यातून शहरवासीयांची लूट होत आहे. 

शहरवासीयांकडून वर्षासाठी सात कोटी रुपयांचा महसूल सांडपाणी अधिभार म्हणून कोल्हापूर महानगरपालिका वसूल करते, पण सांडपाण्यावर जर शहरात कोठेच प्रक्रिया होत नसेल तर दोन महिन्याला एक कोटी सोळा लाख रुपये शहरवासीयांनी का द्यायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.