Wed, Mar 20, 2019 23:06होमपेज › Kolhapur › बिंदू चौक दगडफेक; 10 जणांवर गुन्हा

बिंदू चौक दगडफेक; 10 जणांवर गुन्हा

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आर्थिक वादातून बिंदू चौकात बुधवारी रात्री झालेल्या दगडफेकप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हे दाखल केले. गेले काही दिवस दोन गटांत वाद धुमसत होता. बुधवारी रात्री भांडण मिटविण्यास आलेल्या या गटांत हाणामारी होऊन दगडफेकीचा प्रकार घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी याबाबत फिर्याद दाखल करत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी महंमदजैद शौकत बागवान, शौकत बागवान, इरशत बागवान, उमर करनूरकर, सर्फराज जमादार (सर्व रा. बागवान गल्‍ली, बिंदू चौक) तर दुसर्‍या गटातील अमोल पोवार, प्रशांत दीपक पोवार, मयुर सूर्यवंशी, कुणाल प्रकाश पोवार, सिद्धांत पोवार (सर्व रा. घिसाड गल्‍ली, सोमवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

बागवान गल्‍लीतील शौकत बागवान यांचा मुलगा महंमदजैद आणि सोमवार पेठेतील अमोल पोवार यांच्यात पैशाच्या देवघेवीतून मंगळवारी वाद झाला होता. हा वाद मिटविण्यात आला. मात्र, याबाबत सोमवार पेठेतील काही तरुण बुधवारी रात्री पुन्हा जाब विचारण्यासाठी बागवान याच्याकडे गेले. बिंदू चौकात दोन्ही गट समोरासमोर येऊन हाणामारीचा प्रकार घडला. भांडण सोडविल्यानंतर काही तरुणांनी थोड्या अंतरावर जाऊन दगडफेक केली. यामुळे नागरिकांत घबराट निर्माण होऊन धावपळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगविला. रात्री उशिरापर्यंत बिंदू चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल करत दगडफेक करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला.

Tags : Kolhapur Stone, throwing, each, other,  bindhu chowk