Thu, Apr 25, 2019 22:06होमपेज › Kolhapur › नाव पोटदुखीवरील औषधाचे, पण प्रत्यक्ष औषध सांधेदुखीचे

नाव पोटदुखीवरील औषधाचे, पण प्रत्यक्ष औषध सांधेदुखीचे

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 2:01PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

नागरिकांना स्वस्त दरामध्ये औषधोपचार उपलब्ध व्हावेत, याकरिता केंद्र शासनाने जेनेरिक औषधांची चळवळ सुरू केली असली, तरी या औषधांच्या निर्मितीमध्ये असलेला अक्षम्य गलथानपणा नागरिकांच्या जीवावर कसा बेतू शकतो, असे धक्‍कादायक उदाहरण समोर आले आहे. जेनेरिक औषधांची निर्मिती करून शासकीय रुग्णालयांना पुरवठा करणार्‍या एका कंपनीने पोटदुखीवरील औषधांच्या नावाखाली चक्‍क स्टिरॉईडस्चा पुरवठा केल्याचे निष्पन्‍न झाले. विशेष म्हणजे हे औषध सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांना वितरित झाल्यामुळे आपल्या सार्वजनिक आरोग्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जेनेरिक औषधांची निर्मिती करणारी ही कंपनी हरियाणातील अंबालास्थित आहे. या कंपनीने डायसायक्‍लोमाईन या औषधांचा पुरवठा केला होता. या औषधाच्या स्ट्रीपवर ‘डायसायक्‍लोमाईन’ असे नमूद केले आहे, पण प्रत्यक्षात त्यामध्ये असणार्‍या घटकांच्या सूचीमध्ये डेक्सामेथेसोन (0.5 मिलीग्रॅम) असे नमूद केले आहे. यामुळे या औषधाच्या स्ट्रीपमध्ये नेमके कोणते औषध आहे, ही संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.   

दुसर्‍या एका कंपनीने एका औषधाच्या एकाच बॅचच्या दोन स्ट्रीप्समधील वेगळेपणाने असेच संभ्रमात टाकले आहे. यामध्ये दोन्ही स्ट्रीपवरील अक्षराचे फॉन्ट वेगळे आहेत. ही बाब औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याला अभिप्रेत नाहीत. याच कायद्यानुसार औषधांच्या मूलद्रव्यापुढे आय.पी. (इंडियन फार्माकोपिया) ही अक्षरे नमूद करणे आवश्यक असताना अक्षरे वगळल्याने संबंधित औषध हे ‘इंडियन फार्माकोपिया’ या पुस्तकातील मार्गदर्शक सूचनेप्रमाणे बनविले आहे की नाही, याविषयीही मोठा संभ्रम आहे.

उत्पादन आणि दर्जा यावर संबंधित औषधे ज्या देशामध्ये विकली जाणार आहेत, तेथील अन्‍न व औषध प्रशासनाचे काटेकोर नियंत्रण असते. तेथे अशी बाब चालवून घेतली जात नाही. पण, भारतात मात्र 25 हजार कोटी रुपयांच्या जेनेरिक औषधांच्या बाजारपेठेत सुधार होण्यास मोठा वाव आहे. अर्थात, सर्वच जेनेरिक औषधे दर्जाहीन आहेत, असा अर्थ कोणी काढू नये. पण, जेनेरिक औषधांच्या चळवळीचा पुरस्कार करताना ती अत्युच्च दर्जायुक्‍त असेल, याची खबरदारी घेण्याची गरज या नव्या उदाहरणांनी दाखवून दिली आहे.