Sun, Jul 21, 2019 12:09होमपेज › Kolhapur › संशयिताचा फोटो पोलिसांकडून व्हायरल

संशयिताचा फोटो पोलिसांकडून व्हायरल

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:44PMगडहिंग्लज : प्रतिनिधी

काळभैरव मंदिरात चोरी करणार्‍या तिघांपैकी एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे. बस्तवाड (ता. हुक्केरी, कर्नाटक) मधील काडय्या शिवलिंग पुजारी असे त्याचे नाव आहे. रविवारी गडहिंग्लज पोलिसांनी त्याचा फोटो मिळवून सर्वत्र प्रसिद्ध केला असून, सोशल मीडियावरून हा फोटो व्हायरल केला आहे. 

पुजारी हा सराईत गुन्हेगार असून, कर्नाटकात मंदिरांमध्ये चोरीचे 22 हून अधिक गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. कर्नाटक पोलिसांनाही तो हवा असून, काळभैरव मंदिरातील चोरीमध्ये तो असल्याचे निष्पन्न झाले आहे. काळभैरव मंदिरातील चोरीनंतर दुसर्‍याच दिवशी निपाणी व संकेश्‍वर परिसरातही दोन चोर्‍या झाल्या असून, त्यामध्ये पुजारी याने हात मारल्याचे समजते.

काळभैरव मंदिरात चोरी करण्यापूर्वी यातील चोरट्यांनी   मंदिराची रेकी केली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी स्कू्र डायव्हरच्या सहाय्याने मंदिरातील प्रभावळीसह इतर साहित्य चोरले होते. पोलिसांना या ठिकाणी दोन्हीवेळची सीसीटीव्ही फुटेज व चोरीसाठी वापरलेले स्कू्र डायव्हरही मिळून आले होते. पोलिसांनी तपास गतिमान केला असता, चोरीतील आरोपी हे कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले.

गडहिंग्लज पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे अशाप्रकारचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारांची यादी तपासली. त्यात पुजारी हा यामध्ये फरारी असल्याचे लक्षात आले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व संशयित पुजारी याचे बहुतांशी वर्णन जुळत असल्याने तोच  मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.