होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचा २०० वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडणार

कोल्हापूरचा २०० वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडणार

Published On: Aug 12 2017 9:18PM | Last Updated: Aug 12 2017 8:59PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरमधील तत्कालीन पोलिटिकल सुप्रिटेंडंट मेजर डी. सी. ग्रॅहॅमचा रिपोर्ट कोल्हापूरच्या इतिहासाचा आद्य ग्रंथ म्हणून सोमवारी (दि.१४) प्रकाशित होणार आहे. ‘स्टॅटिस्टीकल रिपोर्ट ऑन द प्रिन्सीपॅलिटी ऑफ कोल्हापूर’ असे ग्रंथाचे नाव आहे.

ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शिवाजी विद्यापीठातील शाहू सिनेट सभागृहात  सकाळी ११ वाजता होणार आहे. ग्रंथाचे प्रकाशन अर्थ व कृषितज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.

१८५४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आदेशावरून कोल्हापूरमधील पोलिटिकल सुप्रिटेंडंट मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांनी सातत्याने सात वर्षे श्रम घेऊन माहिती संकलित केलेला हा एक साधन ग्रंथ आहे.

यामध्ये २०० वर्षांपूर्वीचा कोल्हापूरचे लोकजीवन, उद्योगधंदे, कृषिजीवन, कला, साहित्य यांची अतिशय बारकाईने माहिती दिली ग्रंथामध्ये देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी, कानडी आणि पार्शियन भाषेतील जवळजवळ २५ ते ३० शिलालेखांची माहिती यात आहे. इंग्रज सरकार व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यातील करार तसेच पत्रव्यवहार या ग्रंथात दिला आहे.

२०० वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कसे होते? राजर्षी शाहूपूर्व काळ कसा होता? याचे दर्शन घडवणारा हा एकमेव दस्तऐवज आहे. गेली १०० वर्षे हा ग्रंथ उपलब्ध नव्हता. ठिकठिकाणाहून त्याच्या प्रती मिळवून शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जयसिंगराव पवार त्यावर संशोधन व संपादकीय संस्कार करण्याचे काम तीन वर्षे करत होते. या ग्रंथास त्यांनी ५६ पानांची अत्यंत विवेचक व अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत संपूर्ण ग्रंथाचे सार पाहावयास मिळते. डॉ. पवारांनी संपादित केलेला हा मेजर ग्रॅहॅमचा ग्रंथ इतिहासाचे एक अव्वल दर्जाचे प्राथमिक साधन आहे.