Fri, Apr 19, 2019 12:36होमपेज › Kolhapur › पोलिस अधीक्षकांचे वक्तव्य बेजबाबदार : दिलीप देसाई

पोलिस अधीक्षकांचे वक्तव्य बेजबाबदार : दिलीप देसाई

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 29 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

येथील शिवाजी पुलावरून नदीत मिनीबस कोसळून झालेल्या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळासमोर दिलीप देसाई यांचे नाव का नाही, अशी विचारणा करणारे पोलिस अधीक्षकांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असून यामागचा बोलविता धनी वेगळाच असण्याची शक्यता असल्याचे निवेदन प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रसिद्धीला दिले आहे. पर्यायी शिवाजी पुलाला कधीही विरोध केलेला नाही, उलट त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी आपली मागणी आहे, असेही देसाई यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनीही देसाई यांच्यामुळेच पुलाचे काम रखडल्याचे वक्तव्य केले होते; पण त्यांनी नंतर लेखी दिलगिरी व्यक्त केली. पुलावरील अपघाताचा फायदा घेत जर कोणी गुन्हा दाखल करणारच असेल तर त्यातून त्यांचीच विकृती समाजासमोर येईल.

देसाई यांचे नाव घेतल्याचे आठवत नाही : पोलीस अधीक्षक

जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीसमवेत झालेल्या बैठकीत सदस्यांनी दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी,  सा. बां. विभाग अधिकार्‍यांसह इतरांची नावे होती. त्यात  दिलीप देसाई यांचे नाव नाही. त्यांचे नाव घेतल्याचे नक्की आठवत नाही, अशी प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. ते म्हणाले, दिलीप देसाई यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. अपघाताच्या रात्री व दुसर्‍या दिवशीही ते स्वत: शिवाजी पुलावर होते. पोलिस अधीक्षक म्हणून कोणावरही जाहीर टीका करणे माझ्या स्वभावात नाही.