Tue, Nov 19, 2019 10:05होमपेज › Kolhapur › पोलिस आयुक्तालयासाठी राज्य सरकार सकारात्मक : केसरकर

पोलिस आयुक्तालयासाठी राज्य सरकार सकारात्मक : केसरकर

Published On: Jul 13 2019 1:39AM | Last Updated: Jul 13 2019 1:39AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या आयुक्तालयासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसकर यांनी सांगितले. कोल्हापूर शहराचा विस्तार वाढत आहे. शहरी लोकसंख्याही वाढत आहे. नागरीकरण वेगाने होत आहे. पर्यटक व भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन व्हावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.लोकप्रतिनिधींनी विधानसभेतही याबाबत राज्य शासनाचे अनेकवेळा लक्ष वेधले आहे. निवेदनाद्वारेही अनेकदा ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाला प्रस्तावही सादर केला आहे. पिंपरी-चिंचवडसाठी पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यात आले आहे. सध्या  मुंबईतील मीरा-भाईंदरसाठीही पोलिस आयुक्तालय स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आलेले गृह राज्यमंत्री केसकर यांच्याशी संवाद साधला असता कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय व्हावे, याबाबतचा प्रस्ताव आहे. मात्र, सध्या तो राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव प्रलंबित असला तरी राज्य शासन मात्र कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय व्हावे, यासाठी सकारात्मकच आहे. त्यादृष्टीने त्या प्रस्तावावर प्रक्रिया होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस दलात भरती नेहमीच सुरू असते. जशा जागा रिक्त होत जातील, त्यानुसार त्या-त्यावर्षी त्या जागांसाठी भरती केली जाते. यामुळे पोलिस दलात वेगळी भरती प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले.