कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. खंडपीठाच्या अनुषंगाने 1,100 कोटींचा निधीही निश्चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांची सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी चर्चा करताना पाटील बोलत होते. कोल्हापूर खंडपीठासाठी सरकार सकारात्मक आहे. योग्य दिशेने पावले पडत आहेत. खंडपीठासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा बारमध्ये ई-लायब्ररी करण्याबाबत सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या कामासाठी सक्षम कंत्राटदार शोधून त्याच्याकडून लागणार्या यंत्रणेचा, निधीचा तातडीने अहवाल सादर करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्थायी मुख्य न्यायाधीशपद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाला विलंब होत आहे. खंडपीठ स्थापनेसाठीही स्थायी मुख्य न्यायाधीशांची तातडीने नेमणूक व्हावी, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. शिष्टमंडळात अध्यक्ष अॅड. चिटणीस यांच्यासह सेक्रेटरी सुशांत गुडाळकर, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, अॅड. ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, महिला प्रतिनिधी मनीषा पाटील, स्वाती तानवडे, दीपाली पोवार, अविनाश पाटील यांचा समावेश होता.