Tue, Feb 19, 2019 08:29होमपेज › Kolhapur › सरकारला वठणीवर आणू

सरकारला वठणीवर आणू

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारला वठणीवर आणू, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने गुरुवारी दिला. तीन दिवसांपासून सुरू असलेला सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा   संप  यशस्वी झाला आहे. मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र, ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जात असल्याचेही संघटनेच्या वतीने गुरुवारी जाहीर करण्यात आले. सरकारच्या कारवाईच्या धमक्यांना भीत नाही, असे ठणकावत यावेळी ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईच्या आदेशाची होळी करण्यात आली.

सातव्या वेतन आयोगाची तत्काळ अमंलबजावणी करण्यासह विविध मागण्यांसाठी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मंगळवारपासून तीन दिवस संपाची हाक दिली होती. या संपात सर्व शासकीय कर्मचार्‍यांसह प्राथमिक शिक्षकही सहभागी झाले होते. या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे बंद राहिले. शाळाही बंद राहिल्या.टाऊन हॉल बागेत गुरुवारी झालेल्या सभेत राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. 

यावेळी सरकारचा धिक्‍कार करत शंखध्वनी करण्यात आला. शुक्रवारपासून सर्वांनी कामावर हजर रहावे, संप काळातील काम अधिक वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, रमेश भोसले, हशमत हावेरी, संजय क्षीरसागर, राजाराम वरूटे, भरत रसाळे, प्रभाकर आरडे, संजय पाटील, कृष्णात नाईक, शिवाजी निकम, गणेश आसगावकर आदींसह प्रा. सुभाष जाधव, कॉ. अनिल चव्हाण आदींनी मनोगत व्यक्‍त केले.