Wed, Apr 24, 2019 21:45होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल काम उद्यापासून सुरू 

पर्यायी पूल काम उद्यापासून सुरू 

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुरातत्त्व विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर पर्यायी पुलाच्या बांधकामाला दि. 7 पासून पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. कॉलमसाठी खोदाई करण्यात येणार असून, या महिनाअखेर हा कॉलम उभारण्यात येणार आहे.पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या  रखडलेल्या बांधकामाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाच्या सोमवारी (दि. 4) नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत पर्यायी पुलाच्या बांधकामाला ना-हरकत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रह्मपुरी येथील पुरातत्त्व विभागाच्या जागेपासून 127 मीटर अंतरावर बांधकाम असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पुलाच्या बांधकामाला ना-हरकत देण्याच्या निर्णयावर प्राधिकरणाने शिक्‍कामोर्तब केले. 

पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी ना-हरकत देण्याच्या या निर्णयाच्या प्रतीवर प्राधिकरणाच्या अध्यक्षा व सदस्य यांनी सोमवारीच स्वाक्षर्‍या केल्या. पुढील तांत्रिक कार्यवाहीसाठी प्राधिकरणाने हा प्रस्ताव मुंबई 
येथील क्षेत्रीय कार्यालयाला पाठवला आहे. येत्या पाच-सहा दिवसांत मुंबई येथील कार्यालयातून ना-हरकतबाबतचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्‍त होण्याची शक्यता आहे.या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पर्यायी पुलाचे काम तातडीने सुरू करा, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले. ‘पुरातत्त्व’चा अडथळा दूर झाला आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झाला आहे, यामुळे बांधकाम सुरू करण्यास अडचण नाही, असे स्पष्ट करत ठेकेदारांशी संपर्क साधून बांधकाम तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना  सुभेदार यांनी कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना केली.

पुरातत्त्व विभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत गेले आठवडाभर पर्यायी पुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. आता परवानगी मिळाली असल्याने ठेकेदार एन. बी. लाड यांनी गुरुवारपासून काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी  सकाळपासून कॉलमसाठी खोदकाम केले जाणार आहे. सुमारे 15 तेे 20 फूट खोल आणि 16 बाय 5 मीटरचा खड्डा काढण्यात येणार आहे. हे काम साधारणत: आठ-दहा दिवसांत पूर्ण होईल. यानंतर कॉलम उभारणीचे काम सुरू होईल. या महिन्याअखेर पर्यायी पुलासाठी आवश्यक असलेला कॉलम उभारला जाईल, असेही त्यांनी सांगितले. हे काम पावसातही पूर्ण केले जाईल. यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. कॉलम उभारणी झाल्यानंतर पुलाचा अखेरच्या टप्प्यातील स्लॅब टाकण्यात येणार आहे. मात्र, हे काम नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाल्यानंतरच हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.