Wed, Apr 24, 2019 16:14होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल पिलरसाठी खोदाई सुरू

पर्यायी पूल पिलरसाठी खोदाई सुरू

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानगीविना रखडलेल्या पर्यायी पुलाच्या बांधकामास परवानगी मिळाल्यानंतर अखेर गुरुवारी सुरुवात झाली. ठेकेदाराने गुरुवारी पिलर खोदाईसाठी प्रारंभ केला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत आबदार यांनी श्रीफळ वाढवून खोदाईच्या कामास सुरुवात केली. खोदाईस सुरुवात झाल्याने पर्यायी पुलाच्या कामास गती मिळणार आहे.

तत्कालीन खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या पुढाकाराने 30 मार्च 2012 रोजी शिवाजी पुलास पर्यायी पूल बांधण्यास मान्यता मिळाली. दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचे बंधन होते. जुन्या पुलापेक्षा दोन फूट उंच नवीन पुलाची जादा उंची ठेवण्यात आली आहे. 47.40 मीटरचे दोन आणि 23.70 मीटरचा एक असे एकूण तीन गाळे बांधण्यात येत आहेत. रत्नागिरी बाजूकडील दोन गाळे बांधून पूर्ण झाले आहेत. कोल्हापूरकडील बाजूचे एक खांब आणि एक गाळा व या गाळ्याचे स्लॅबएवढे काम शिल्‍लक आहे. पुलाच्या 80 टक्के बांधकामावर दहा कोटी 50 लाख रुपये खर्च झाले आहेत. पुलाचे काम मे.बंका कन्स्ट्रक्शन या कंपनीस देण्यात आले होते. पुरातत्त्व कायद्याच्या अडथळ्यामुळे 15 डिसेंबर 2015 पासून ठेकेदाराने काम बंद केले.

पुलाच्या प्रलंबित कामाचा ठेका आसमास कन्स्ट्रक्शनला  देण्यात आला आहे. पुरातत्त्व विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी संयुक्‍त सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी टेकडी आणि पर्यायी पूल यातील अंतर निश्‍चित केले. या सर्वेक्षणातील अंतराचा महत्त्वाचा मुद्दा ग्राह्य धरूनच राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या बैठकीत परवानगीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. या बैठकीचे इतिवृत्त राष्ट्रीय महामार्ग विभागास प्राप्‍त झाले. त्यानुसार पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामास सुरुवात करण्यात आली. पिलरसाठी खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम तातडीने पूर्ण करून पिलर उभारण्याचे नियोजन आहे. तर नदीपात्रातील पिलर आणि कोल्हापूरकडील नव्याने बांधण्यात येणारा पिलर यावर स्लॅब टाकण्यात तांत्रिक अडचणी असल्याने हे काम पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. 
शाखा अभियंता प्रशांत मुंगाटे,  ठेकेदार एन. डी. ऊर्फ बापू डी. लाड  आदी  उपस्थित होते. सकाळी कृती समितीचे बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, दीपक पाटील, बंटी पाटील, तानाजी पाटील, मदन साठे, कुमार खोराडे यांनी पर्यायी पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली.