Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Kolhapur › पक्षी बचाव मोहिमेचा पन्हाळगडावर प्रारंभ

पक्षी बचाव मोहिमेचा पन्हाळगडावर प्रारंभ

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 02 2018 1:03AM

बुकमार्क करा
पन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळगडावर नववर्षाच्या सकाळी कोडोलीच्या मावळा प्रतिष्ठान तर्फे पक्षी बचाव मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या निमित्ताने पावनगडावर सोमवारी प्रतिष्ठानच्या वतीने पक्ष्यांना खाद्य व पाणी देण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली असून पन्हाळा उपनगराध्यक्ष हारुण मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठिकठिकाणी मातीच्या तबकात खाद्य व पाणी ठेवण्यात आले. याबाबत मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, ग्लोबिंग वार्मिंग, नैसर्गिक खाद्याचा अभाव यामुळे पन्हाळा व पावनगडावरील विविध पक्षी नामशेष होत आहेत, तसेच अन्‍नाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.

या पक्ष्यांना जगवण्यासाठी व त्यांच्या रक्षणासाठी मावळा प्रतिष्ठान या संस्थेने कोडोली परिसरातील विविध मंगल कार्यालयातून लग्‍न समारंभातील अक्षता गोळा करून त्या अक्षता स्वच्छ करून पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरात आणल्या आहेत. पन्हाळा व पावनगड येथे झाडावर, तसेच जेथे पक्षी अधिक प्रमाणात बसतात अशा जागांवर मातीची तबके बसवून त्यात हे धान्य व पाणी ठेवले आहे, हे धान्य व पाणी संपले कि पुन्हा पुन्हा ही तबके खाद्य भरून ठेवले जाणार आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक पक्षी जतन होतील तसेच जे पक्षी स्थलांतरित होत आहेत त्यांचे स्थलांतर थांबेल व या भागातील पक्षी नामशेष होणार नाहीत. उलट अनेक विविध जातीचे पक्षी  अन्‍नाच्या  शोधात असतात त्यांना मुबलक अन्‍न मिळते  म्हणून या भागात पक्षी संख्या वाढण्यास मदत होईल, असेही संदीप पाटील यांनी सांगितले. पन्हाळा उपनगराध्यक्ष हारुण मुजावर यांनी मावळा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी धडेल, तौफिक हारुण मुजावर, डॉ. सावर्डेकर, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे व पक्षीप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. पन्हाळा येथे येणार्‍या पर्यटकांनी पन्हाळा येथे येताना कच्चे खाद्य आणावे व या अभिनव अशा उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले.