Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Kolhapur › मंगळवार पेठेकडून ‘शिवाजी’ला पराभवाचा धक्‍का

मंगळवार पेठेकडून ‘शिवाजी’ला पराभवाचा धक्‍का

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:38AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

नवोदित मंगळवार पेठ फुटबॉल संघाने बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाला 2-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्‍का दिला. संपूर्ण वेळ तुल्यबळ राहिलेल्या दुसर्‍या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने संयुक्‍त जुना बुधवार पेठेवर टायब्रेकरमध्ये 4-2 अशी मात केली. 

पाटाकडील तालीम मंडळ व डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धेस रविवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रारंभ झाला. यंदाची स्पर्धा कै. पांडबा जाधव स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन आ. हसन मुश्रीफ  यांच्या हस्ते आणि आ. सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी महापौर सौ. स्वाती यवलुजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, पोलिस निरीक्षक अनिल गुजर, पाटाकडील तालमीचे अध्यक्ष सुभाष सरनाईक, मनपाचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक संभाजी जाधव, प्रवीण केसरकर, सतेज चषक 2018 च्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष निवास जाधव, फुटबॉल संघाचे अध्यक्ष सपोनि शरद माळी, राजेंद्र ठोंबरे, बाळासाहेब निचिते, रावसाहेब सरनाईक, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, संपत जाधव, दुर्वास कदम, लाला भोसले, प्रदीप झांबरे आदी उपस्थित होते. निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले. राष्ट्रगीताने सामन्याची सुरुवात झाली. 

मंगळवार पेठ विजयी...

दुपारच्या सत्रातील सामन्याच्या 15 व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या अक्षय सरनाईकने नोंदविलेल्या गोलची परतफेड मंगळवार पेठ क्‍लबच्या आकाश माळीने 34 व्या मिनिटाला केली. यामुळे मध्यांतरापर्यंत सामना 1-1 असा तुल्यबळ ठरला. यामुळे उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आघाडीसाठी जोरदार प्रयत्न झाले. यात मंगळवार पेठ संघाने बाजी मारली. 79 व्या मिनिटाला नीलेश खापरे याने गोल नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यांच्या शिवम पोवार, नितीन पोवार, गोलरक्षक हनुमान गोजारे, बचाव फळीतील विकी जाधव, भरत पाटील, आकाश व सचिन पाडळकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. उर्वरित गोल शिवाजी मंडळला फेडता आली नाही. यामुळे सामना मंगळवार पेठेने जिंकला. 

टायब्रेकरमध्ये खंडोबाची सरशी...

सायंकाळच्या सत्रातील संयुक्‍त जुना बुधवार पेठ विरुद्ध खंडोबा तालीम यांच्यातील सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांकडून आक्रमक चढायांसह आघाडीसाठी प्रयत्न झाले. मात्र, दोन्हींकडील भक्‍कम बचावामुळे कोणालाही गोल करता आला नाही. यामुळे संपूर्ण वेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात खंडोबाकडून विकी शिंदे, सागर पोवार, ऋतुराज संकपाळ आणि कपिल शिंदे यांनी बिनचूक गोल केले. तर रणवीर जाधवचा फटका बाहेर गेला. प्रत्युत्तरादाखल जुना बुधवारच्या हरिष पाटील व निखिल कुलकर्णी यांना गोल करण्यात यश आले. मात्र, महेश पाटील व किरण कावणेकर यांचे स्ट्रोक खंडोबाचा गोलरक्षक रणवीर खालकरने उत्कृष्टरीत्या रोखत संघाला 4-2 असा विजय मिळवून दिला.