Fri, Jul 19, 2019 07:47होमपेज › Kolhapur › जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ

जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जोतिबा : वार्ताहर

जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला कामदा एकादशीपासून सुरुवात होते. या एकादशीपासूनच जोतिबा चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होते. आज बेळगावच्या सासनकाठीचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले.  यात्रेच्या निमित्ताने जोतिबा डोंगरावरील बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. घाऊक व्यापार्‍यांची  रेलचेल वाढली आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग जोतिबा डोंगरावर तळ ठोकून आहेत. जोतिबा ग्रामपंचायतीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जोतिबा चैत्र यात्रेसाठी सुमारे 6 ते 7 लाख भाविक जोतिबा डोंगरावर येतात. त्यांना यात्राकाळात भरपूर पाणीपुरवठा व्हावा म्हणून जोतिबा ग्रामपंचायतीने गायमुख तलावात 1 कोटी लिटर पाण्याचा साठा करून ठेवला आहे. तसेच सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली आहे. यात्राकाळात पाणीपुरवठा यंत्रणेत अडचणी येऊ नये म्हणून या यंत्रणेतील सर्व दुरुस्त्या जोतिबा ग्रामपंचायतीने पूर्ण केल्या आहेत. 

पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांवर औषध फवारणी करण्यात आली. पाण्याची परिस्थिती पाहता भाविकांनी आणि ग्रामस्थांनी यात्रा काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन जोतिबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रिया सांगळे यांनी केले आहे. तसेच भाविकांनी जोतिबा डोंगर प्लास्टिकमुक्‍त करण्याच्या उद्देशाने जोतिबा ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यात्राकाळात भाविकांना अन्‍नदान करणार्‍या सर्व सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अन्‍नछत्राच्या ठिकाणी मंडप घालण्याचे काम करत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी घराघरांत जाऊन पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांची तपासणी करून औषध फवारणी करत आहेत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे दुकानदारांनी कापडी पिशव्या देण्यावर भर दिला आहे. एकूणच जोतिबा डोंगरावर सध्या यात्रामय वातावरण झाले आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Start, Jotibas Chaitra Yatra


  •