Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Kolhapur › अन् महापालिकेत बिन आवाजाचा बॉम्ब फुटला!

अन् महापालिकेत बिन आवाजाचा बॉम्ब फुटला!

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 2:04AMकोल्हापूर : सतीश सरीकर

स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवार मेघा पाटील या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सून आहेत. तसेच भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मेघा या पुतणी असल्या तरी मुलीसारखेच त्यांनी वाढविले. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप असल्याने साहजिकच सर्वचजण गाफील राहिले. त्यातच गेले काही महिने ‘ए. वाय. भाजपच्या वाटेवर’ अशा चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची पुतणी आणि राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांच्या सुनेची निवडणूक असल्याने फोडाफोडीचे राजकारण होईल, असे कुणालाच वाटले नाही. परंतु, पडद्यामागून अशा काही हालचाली घडल्या की महापालिकेत भाजपने म्हणजेच महाडिकांनी ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फोडला. विजय निश्‍चित असतानाही मेघा पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यामागे अनेक हालचाली दडल्या आहेत.

मेघा आशिष पाटील या सुर्वेनगर प्रभागाचे ‘नेतृत्व’ करतात. शिवाजी पेठमधील कोराणे कुटुंबातील सम्राट यांच्या पत्नी व मेघा पाटील ‘सख्ख्या बहिणी’ आहेत. आशिष पाटील व सम्राट कोराणे साडू आहेत. मेघा पाटील यांचे ‘स्थानिक विरोधक’ अभिजित खतकर हे सम्राट कोराणे यांचे कार्यकर्ते. त्यामुळे खतकर यांच्या प्रचारात सम्राट कोराणे सहभाग घेणार होते. परंतु, कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांनी अखेरीस मेघा पाटील यांचा प्रचार केला. त्यानंतर काही कारणावरून आशिष पाटील व सम्राट कोराणे यांच्यात ‘वाद’ झाल्याचे सांगण्यात येते.

सुर्वेनगर प्रभागात खतकर याने घेतलेल्या ‘समस्या नगर’, ‘ओळखा पाहू’ स्पर्धा घेतल्यापासून पाटील हवालदिल झाले होते. त्यातच खतकर याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सम्राट हे सुर्वेनगर परिसरात गेले होते. त्यावरूनही आशिष व सम्राट यांच्यात ‘अबोला’ निर्माण झाला. माजी महापौर हसिना फरास यांचा मुलगा माजी नगरसेवक आदिल फरास व आशिष पाटील यांच्यात ‘मैत्री’ आहे. फरास महापौर झाल्यापासून आशिष व आदिल महापालिकेत ‘एकत्रच’ फिरत होते. त्यावेळेपासूनच आदिल यांनी मेघा पाटील सभापती होण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येते. परंतु, आदिल फरास व कोराणे यांच्यात काही कारणावरून वाद असून ते ‘टोकाचे’ असल्याची चर्चा आहे. त्यातच मेघा पाटील स्थायी सभापती झाल्यास आदिल फरास हेच सर्व सूत्रे हलविणार ही ‘काळ्या दगडावरची रेघ’ होती. कोराणे यांच्यासाठी ती ‘रेष’ डोकेदुखी ठरणार होती. परिणामी ‘एका दगडात दोन पक्षी’ मारण्यासाठी सम्राट यांनीच नातेवाईक असलेल्या अजिंक्य चव्हाण यांना सभापतिपदाच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. 

अजिंक्य यांनी उमेदवारी अर्जही भरून ठेवला. मात्र, काही कारणांमुळे पुन्हा त्यांना माघार घ्यावी लागली. अखेर ही ‘धुसफूस’ थेट निवडणुकीत बाहेर पडली. उमेदवारी अर्ज माघारीच्या पंधरा मिनिटांत अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी चर्चा केली. माघारीच्या मुदतीत ‘डाव’ साधला. मेघा पाटील यांना ‘धक्‍का देण्याचा निर्धार पक्‍का’ केला. कारभार्‍याच्या भूमिकेतील आदिल फरास यांना ‘शह’ देण्यासाठी दोघांनीही हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

ईर्ष्येचे राजकारण महापालिकेत रंगणार...

महापालिकेत सध्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात ‘टोकाचे राजकारण’ सुरू आहे. एकमेकांशी बोलणे लांबच, साधे बघतही नाहीत. अशाप्रकारे सत्ताधारी व विरोधकांतून अक्षरशः ‘विस्तव’ही जात नसल्याचे वास्तव आहे. त्यातच आता महापालिकेची ‘सत्ता’ काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आणि ‘आर्थिक नाड्या’ भाजप-ताराराणीच्या हातात अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे राजकारण आणखीनच ईर्ष्येचे बनणार आहे. 

अमल यांनी घेतला बदला?

1999 मध्ये बाबू फरास यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेविरुद्ध ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फोडून ‘महापौरपद’ मिळविले होते. आता त्यांचे पुत्र आदिल यांच्या कारभाराविरुद्ध बंडखोरी करून ‘राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांकरवी’ बिन आवाजाचा बॉम्ब फोडून महाडिक यांचे पुत्र आमदार अमल यांनी बदला घेतला असल्याची चर्चा महापालिकेत सुरू होती.

महापौर निवडणुकीत ‘धोबीपछाड’ देणार?

महापालिकेत सध्या काँग्रेस 29, राष्ट्रवादी 15, शिवसेना 4, ताराराणी आघाडी 19 व भाजपचे 14 नगरसेवक आहेत. आता राष्ट्रवादीतून दोन नगरसेवक फुटल्याने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यानंतर मे मध्ये होणार्‍या महापौरपदाच्या निवडणुकीचीही तयारी केली जाणार आहे. महापौर निवडणुकीतही विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘धोबीपछाड’ दिली जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.

सर्व पदे महिलांनाच का? म्हणूनही विरोध...

गेल्या सभागृहातील पाच वर्षे महापौरपद महिलांसाठी राखीव होते. या सभागृहाचे पाच वर्षही महापौरपद महिलांसाठीच राखीव आहे. अशाप्रकारे महापालिकेतील सर्वाधिक मानाचे पद दहा वर्षे महिलासाठी आरक्षित आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतिपद महिलेलाच द्यावे लागते. त्यातच उपमहापौर व शिक्षण मंडळ सभापतिपदही महिलांनीच भुषविले आहे. एकदा ‘प्रथा’ पडली की पुढील वर्षी काँग्रेसमधूनही महिलांनी मागणी केली असती. त्यामुळे एक तरी पद पुरुषांना कायम रहावे म्हणून स्थायी समिती सभापतिपदासाठी मेघा पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादीमधूनच तीव्र विरोध दर्शविण्यात येत होता. त्यावरून प्रचंड धुसफूसही सुरू होती.