Tue, Aug 20, 2019 04:47होमपेज › Kolhapur › आरोग्य, थेट पाईपलाईनप्रश्‍नी स्थायी सभेत प्रशासन धारेवर

आरोग्य, थेट पाईपलाईनप्रश्‍नी स्थायी सभेत प्रशासन धारेवर

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:21AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

आरोग्य विभागातील सेवा आणि थेट पाईपलाईन कामातील त्रुटी या मुद्द्यांवरून शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनास सदस्यांनी धारेवर धरले. थेट पाईपलाईन कामांवर कोणाचे नियंत्रण आहे का, असा सवाल करून प्रशासनाची चांगलीच कोंडी करण्यात आली. डॉ. संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. 

सत्यजित कदम यांनी कचरा उठावासाठी आर.सी. गाड्या उपलब्ध होत नाहीत. कंटेनर रात्रीत कापून नेले जातात, 380 कर्मचार्‍यांना कायम सेवेत समाविष्ट करणे आदी प्रश्‍नांवर प्रशासनाकडे विचारणा केली. आर.सी.गाड्या पासिंग सुरू आहे. खराब कंटेनर चार दिवसांत स्टोअरकडे जमा करू, अशी उत्तरे देण्यात आली. तर थेट पाईपलाईन कामावर नियंत्रण आहे की नाही, असा सवाल कदम यांनी केला. गोंगाणे यांच्या जागी अद्याप कोणी हजर झाले नाही. 

जाहिरात देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. तर अमृत योेजनेच्या निविदेबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर प्रशासनाने प्रस्ताव सादर करण्याचे आश्‍वासन दिले. उमा इंगळे यांनी शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेचे काय, अशी विचारणा केली. यावर प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून लवकरच प्राधान्यक्रमाने स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. इंगळे यांनी शहरातील रस्त्यांवरील बंद वाहने हलविण्याचे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित केला. क्रेन भाड्याने घेऊन लवकरच कारवाईचे आश्‍वासन दिले. बंद सिग्नलबाबत देखभाल-दुरुस्तीचा वार्षिक ठेका देण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

डेंग्यूबाबत दहा वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत शहरात सर्वेक्षण सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अतिक्रमण मोहिमेनंतर पुन्हा गाड्या लावण्यात येतात. त्यावर रात्री आणि दिवसा अतिक्रमण मोहीम राबविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मैलायुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याचे आशिष ढवळे यांनी निदर्शनास आणले. त्यावर खराब झालेली वितरण व्यवस्था बदलावी लागेल, त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे आश्‍वासन दिले. बालरोगतज्ज्ञाबाबत अहवाल सादर करण्याचे आश्‍वासन दिले.