Wed, Jul 24, 2019 06:35होमपेज › Kolhapur › अतिक्रमणावर मारा हातोडा 

अतिक्रमणावर मारा हातोडा 

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 11:01PMकोल्हापूर : प्रतिनिधी

तावडे हॉटेलप्रकरणी आता शासनाने दिलेले स्थगिती आदेश मागे घेतले आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता महापालिकेने अतिक्रमणातील बांधकामांवर थेट हातोडा मारावा, अशी मागणी स्याथी समिती सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे होते. 

यावेळी  अफजल पिरजादे पोकलँड भाड्याने घेण्यापेक्षा महापालिका विकत का घेत नाही. रु.60 लाख कशासाठी दरवर्षी खर्च करायचे. आतापर्यंत महापालिकेचे स्वत:चे दोन पोकलँड झाले असते. आरोग्य विभाग सगळ्या गोष्टी भाड्याने का घेते? रेट अ‍ॅनॅलेसिस करून दाखवा. प्रशासनाने भाड्याने घेणे महापालिकेस परवडते असे सांगून याबाबतची स्पष्टता देऊ, असे सांगितले. देवकर पाणंद चौक येथे नैसर्गिक नाला होता. त्यावर बांधकामे केली आहे. याबाबत वारंवार प्रश्‍न उपस्थित करूनही का कारवाई केली जात नाही, असा प्रश्‍न दीपा मगदूम यांनी उपस्थित केला. याबाबत वॉर्ड ऑफिसने नोटीस दिली आहे. बांधकाम थांबविण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. 

तावडे हॉटेलप्रश्‍नी निकाल झाला आहे. आयुक्‍तांनी कोणत्याही दडपणाखाली न राहता तातडीने अतिक्रमणावर हातोडा मारा. येत्या आठ दिवसांत कारवाई करा, अशी मागणी दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील यांनी केली. यावर आयुक्‍तांशी चर्चा करून कारवाईचे नियोजन करू, असे सांगितले. 

महापालिकेच्या वतीने नुकतीच कामगारांची  ओळखपरेड घेण्यात आली. यामध्ये एका प्रभागात 40 कामगार आहेत. कर्मचार्‍याचे समान वाटप करा. कर्मचारी सांगतात कामासाठी हत्यारे नाहीत. काही कामगार हजेर्‍या लावून घरी जातात, असा प्रश्‍न प्रतीक्षा पाटील यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाने पुढील मिटिंगपूर्वी प्रभागाप्रमाणे  कर्मचार्‍यांची यादी स्थायी समितीस व आयुक्‍तांना सादर करू, असे प्रशासनाने सांगितले. गेल्या मार्चमधील कामे टेंडरला नाहीत. 6 ते 8 महिन्यांपूर्वी अदाबाकी झाली असून टेंडर काढलेले नाही. अशी 40 कामे पडून आहेत. काही कामांच्या फाईली सापडत नाहीत. पेंडिंग कामासाठी कॅम्प का घेतला नाही. तातडीने कॅम्प घ्या, अशी मागणी सत्यजित कदम यांनी केली. यावर ऑडिट विभागाने पुन्हा अदाबाकी करायला सांगितले आहे.

सत्यजित कदम यांनी 2012 पासून घरफाळा लावावा म्हणून नागरिक फेर्‍या मारत आहेत. अजून घरफाळा लावलेला नाही. संबंधित कर्मचार्‍यावर काय कारवाई करणार. घरफाळा सर्व्हे करणार्‍या कंपनीचे कर्मचारी नागरिकांकडे पैसे मागतात. कंपनीस ब्लॅकलिस्ट करा. त्यांचे पैसे भागवू नका असे सांगितले. यावर  ठेकेदारावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्‍तांकडे सादर करू, असे प्रशसनाने स्पष्ट केले.