Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Kolhapur › रेल्वेतील जीवघेणी स्टंटबाजी!

रेल्वेतील जीवघेणी स्टंटबाजी!

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 11:21PMकोल्हापूर : दिलीप भिसे

सुसाट धावणार्‍या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या टपावरून बेधडक उड्या मारणे, पळणे, उंच पुलावरून नदीत उड्या टाकणे ही स्टंटबाजी काही नवी नाही. मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत अशा घटना सर्रास प्रत्यंतरास येतात. मात्र, आता त्याचे लोण कोल्हापूर, सांगलीपर्यंत आले आहे. कोल्हापूर-सांगली मार्गावरील पॅसेंजर रेल्वेमध्येही हुल्लडबाज टोळक्यांकडून जीवघेेणी स्टंटबाजी सुरू झाली आहे. काळजाचा ठोकाच चुकावा, असा जीवघेणा थरार घडवला जातो आहे.

पॅसेंजर बोगीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून अवघ्या एका बोटावर शरीराचा तोल सांभाळणे, खिडकीच्या गजाच्या आधारे बोगी बदलणे, रेल्वे धावत असताना उड्या टाकणे, थेट नदीत उड्या टाकणे अशा जीवघेण्या कृत्यांना उधाण आले आहे. रोज घडणार्‍या घटनांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. 

सकाळी आठला सांगलीतून कोल्हापूरकडे 

धावणार्‍या पॅसेजरला नोकरदार,व्यापार्‍यासह सामान्य प्रवाशांची झुंबड उडालेली असते. कॉलेज तरूण-तरूणीसह गांधीनगरला रोजगारासाठी जाणार्‍या कामगारांची संख्याही भरमसाठ असते. सकाळ, सायंकाळच्या सत्रातील पॅसेंजरचा प्रवास हाऊस फुल्ल ठरलेला असते.

धावत्या रेल्वेतून नदीत उड्या...

सतरा ते पंचवीस वयोगटातील काही स्टंटबाज तरूणांचा पॅसेंजरमध्ये नित्याने धुमाकूळ सुरू असतो. हमखास प्रवेशद्वारावर जागा रोखून घातक कसरतींचा उद्योंग सुरू असतो. विशेषत: हातकणंगले-गांधीनगर मार्गावर थरारक स्टंटबाजी अनुभवाला येत असते. शनिवारी (दि.7) सकाळी दोन हुल्लडबाजांनी पॅसेंजरमधून रूकडी येथील पंचगंगा नदीत उड्या टाकल्या. डोळ्यादेखत घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांचा थरकापच उडाला होता. 

हुल्लडबाजांना रोखा

हुल्‍लडबाज टोळक्यांकडून महिला, युवतींना रोजचा त्रास सोसावा लागतो आहे. छेडछाड, गर्दीचा फायदा घेत धक्‍का देण्याचेही प्रकार घडत आहेत. एखाद्याने चार गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून जाणे, मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. सराईतांची माजलेली दहशत मोडीत काढणे गरजेचे आहे. सोकावलेल्या हुल्ल्डबाजांना आता रोखण्याचीच गरज आहे.