Sun, Mar 24, 2019 17:20होमपेज › Kolhapur › सेंट झेव्हिअर्सचा हीरक महोत्सव साजरा

सेंट झेव्हिअर्सचा हीरक महोत्सव साजरा

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:19AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जुन्या शिक्षकांच्या, मित्रांच्या भेटी-गाठीतून जुन्या आठवणींना उजाळा देत अपूर्व अशा जल्लोषी उत्साहात सेंट झेव्हिअर्स स्कूलचा शनिवारी हीरक महोत्सव साजरा झाला. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, ‘झेसाकॉप’ माजी विद्यार्थी संघटनेचे चीफ पेट्रॉन डॉ. प्रतापसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेंट झेव्हिअर्स हीरक महोत्सवानिमित्त ‘झेसाकॉप’ माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून शाळेच्या परिसरात गत 60 वर्षांतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी जमण्यास सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारास असेंब्लीस सुरुवात होऊन शाळेची प्रार्थना झाली. एन.सी.सी.चे विद्यार्थी प्रमुख मान्यवरांना व्यासपीठाकडे घेऊन आले. मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात बहारदार नृत्य व गीते सादर करून उपस्थितांकडून टाळ्या, शिट्ट्यांची दाद मिळविली. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक व ‘झेसाकॉप’ माजी  विद्यार्थी  संघटनेचे  चीफ पेट्रॉन डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी हीरक महोत्सवानिमित्त सेंट झेव्हिअर्स स्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, याच शाळेच्या इमारतीत 2007 मध्ये झालेल्या सुवर्ण महोत्सव  समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले, माझ्यासाठी हा मोठा सन्मान होता. सुवर्ण महोत्सव ते हीरक महोत्सव शाळेची वाटचाल तेजस्वी अशीच राहिली आहे. शाळेचे विद्यार्थी चमकणार्‍या  हिर्‍याप्रमाणेच तेजस्वी आहेत. विद्यार्थिदशेत असताना आपल्याला हिर्‍याचे वैभव लाभले होते. फरक इतकाच होता की त्यावेळी हिर्‍याला पैलू पडले नव्हते. शाळेच्या वास्तूत ते पैलू पाडले गेले.

आज प्रत्येक  विद्यार्थी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर तेजस्वी कामगिरी करून चमक दाखवित असल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले, ज्या शाळेच्या  वास्तूत घडलो, जडणघडण झाली त्याच शाळेत अनेक वर्षांनंतर परत आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात भाव-भावनांनी दाटी झाली असणार याची जाणीव आहे. हीरक महोत्सवाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी शालेय विश्‍वात रमून गेले आहेत. शालेय जीवनातील आठवणींपासून दूर जाणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शाळेतील आठवणी हृदयातून कधीच काढून टाकता येत नाहीत.

सेंट  झेव्हिअर्स स्कूलचा मी 1962 च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी. या बॅचचा निकालही त्यावेळी  शंभर टक्के लागला होता. बॅचमधील सर्वांनी आता वयाची सत्तरी ओलांडली आहे. दुर्दैवाने यातील काही जण आता हयात नाहीत. इतक्या वर्षांनंतर पूर्वायुष्यात डोकावताना मनामध्ये भावनांची दाटी होत आहे. या शाळेच्या इमारती, भिंतींनी गेल्या साठ वर्षांत अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. इकडून तिकडे धावणारी मुले, त्यांचे खिदळणे, हास्यविनोद, गप्पा हे सर्व ही वास्तू वर्षानुवर्षे अनुभवत राहिली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यागी वृत्तीने विद्या दान करणारे शिक्षक यांचीही ही इमारत साक्षीदार असल्याचे गौरवोद‍्गार डॉ. जाधव यांनी काढले. 

शालेय जीवनातील शेअर करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. त्यासारखे सुंदर आणि अभिमानास्पद दुसरे काही असूच शकत नाही. शाळेेतील जीवन म्हणजे जणू स्वर्गच होता. आता प्रत्येक जण आपल्या उद्योग, व्यवसाय, नोकरीत रमून गेला आहे. मात्र, यावरच आयुष्याचे पूर्ण सार्थक झाले असे नसून अजून बरेच काही साध्य करायचे आहे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. जाधव यांनी यावेळी केले. 

शाळेचे माजी मुख्याध्यापक फादर बर्टी रोझारियो यांनी विद्यार्थ्यांना हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्ञानेश्‍वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘हे विश्‍वची माझे घर’ या उक्‍तीप्रमाणे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देश व स्कूलचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत. 

‘झेसाकॉप’ माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते म्हणाले, दहा वर्षांनंतर ऐतिहासिक क्षण माजी विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाला आहे. जीवनातील सर्वच आघाड्यावर शाळेचे विद्यार्थी यशस्वी ठरत आहेत. स्कूलच्या उभारणीसाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागासाठी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माजी मुख्याध्यापक फादर बर्टी रोझारियो, मुख्याध्यापक फादर जेम्स थोरात यांच्याकडे 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. 1962-63 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यातर्फे निवृत्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी निर्मल लोहिया, बाबा प्रसाद लंका, फ्रँक मोंटेरो, डॉ. चेतन व्हटकर, डॉ. विमल तिवडे या माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक फादर जेम्स थोरात यांनी स्वागत-प्रास्ताविकात शाळेच्या 60 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. 

यावेळी दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संचालक, संपादक डॉ. योगेश जाधव, डॉ. डी.वाय.पाटील शिक्षण समूहाचे डॉ. संजय डी. पाटील, आ. सतेज पाटील, भाग्यश्री पाटील, उद्योगपती विजय मेनन, उद्योगपती भरत जाधव, महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल, ऋतुराज पाटील, नितीन मेनन, सतीश घाटगे, शंकर दुल्हानी, नरेश चंदवाणी, डॉ. उद्धव केळवकर, दीपक गद्रे, शिवप्रसाद पाटील, अमरदीप पाटील, उपमुख्याध्यापिका बेनिटा मोंटेरो यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थिनी प्रिया डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘झेसाकॉप’ माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष मोहन घाटगे यांनी आभार मानले. यावेळी उद्योग, व्यापार, व्यवसाय, डॉक्टर आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध नामवंत, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने आपुलकीने उपस्थित होते.

भेटीगाठी अन् सेल्फीचा आनंद...

बर्‍याच वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.  काही जणांना अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण मोबाईल कॅमेर्‍यात टिपण्यासाठी माजी विद्यार्थी धडपडत होते.  या आठवणी जपून ठेवण्यासाठी मित्रांसमवेत सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करण्यात विद्यार्थी मग्‍न झाले होते.