Fri, Apr 26, 2019 16:03होमपेज › Kolhapur › क्रीडा शिक्षकांना स्पर्धांवेळी उपस्थितीची सक्‍ती

क्रीडा शिक्षकांना स्पर्धांवेळी उपस्थितीची सक्‍ती

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 10:59PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

शालेय क्रीडा स्पर्धांवेळी संबंधित शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी मैदानात  उपस्थित राहणे गरजेचे आहे. क्रीडा शिक्षक  उपस्थित  न राहिल्यास त्या शाळेवर कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिला.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांना 19 जुलै पासून प्रारंभ होत आहे. या संदर्भातील नियोजन बैठक आणि ऑनलाईन नोंदणीसाठीचे प्रशिक्षण असा संयुक्त उपक्रम जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे मंगळवारी  मनपाच्या मामा भोसले विद्यालयात झाला. क्रीडा स्पर्धांसाठी शाळांनी क्रीडा शिक्षकांना खेळाडूंसमवेत मैदानावर पाठविणे आवश्यक असते. पण, काही शाळा ठराविक क्रीडा प्रकार सोडले तर क्रीडा शिक्षकांना मैदानावर पाठवत नाहीत. यामुळे स्पर्धा आणि खेळाडूंच्या खेळावर त्याचा परिणाम होतो. खेळाडूंकडून स्पर्धेकडे दुर्लक्ष केले जाते. शालेय प्रशासन मात्र क्रीडा शिक्षकांना न सोडण्याची भूमिका घेते. हा विषय शिक्षक शिक्षकांच्या बैठकीत उपस्थित झाला.

यावर क्रीडा अधिकारी साखरे म्हणाले, क्रीडा स्पर्धेतील प्रकारांवेळी खेळाडूंसमवेत त्या त्या शाळांतील क्रीडाशिक्षक असणे महत्त्वाचे आहे. क्रीडाशिक्षक अनुपस्थित राहिले तर त्या शाळांचा संघ स्पर्धेत घेतला जाणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळांची राहील. त्यामुळे प्रत्येक शाळेने क्रीडा शिक्षकांना खेळाडूंसमवेत सोडणे आवश्यक आहे. याबाबतीत शाळांनी हयगय केली तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. त्या संदर्भातले पत्र सर्व शाळांना पाठविले जाणार आहे. या वेळी सर्व क्रीडा शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत त्यांना समजावून सांगण्यात आली. ऑनलाईन खेळाडूची नोंदणी झाली नाही तर त्याला स्पर्धेत भाग घेता येणार नाही, असा इशाराही देण्यात आला.बैठकीस मनपाच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्र. प्रशासन अधिकारी शंकर यादव,  क्रीडाधिकारी बालाजी बरबडे, राजेंद्र घाटगे,  विकास माने, रवींद्र पाटील, मनपाचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संदीप जाधव, कोंढावळे, आर. डी. पाटील, संतोष कुंडले आदी उपस्थित होते.

पालकांनी मैदानावर येऊ नये : प्रा. पाटील-मांगोरे 

स्केटिंग व जलतरण स्पर्धावेळी क्रीडा शिक्षक व खेळाडू यांनीच मैदानावर हजेरी लावावी. पालकांनी मैदानावर येऊ नये. तसे झाल्यास वादाचे प्रसंग घडतात. यामुळे क्रीडा शिक्षकांनी केवळ खेळाडूंनाच घेऊन मैदानावर यावे, असे आवाहन अधिकारी राजेंद्र घाडगे यांनी केले. काही क्रीडाशिक्षक खेळाडूंना मैदानावर लवकर पाठवून स्वत:  मैदानावर उशिरा  हजेरी लावतात.  हा प्रकार चुकीचा असून, क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंसमवेतच मैदानावर यावे, असे आवाहन प्रा. योगेश पाटील-मांगोरे यांनी केले.