Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Kolhapur › क्रीडा संकुल दर्जेदार झालेच पाहिजे

क्रीडा संकुल दर्जेदार झालेच पाहिजे

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 10:59PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरात दर्जेदार क्रीडा संकुल झालेच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्या वतीने महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या क्रीडा विभागाने येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. 

कोल्हापुरात 2009 ला 17 एकर जागेवर 24 कोटींच्या निधीतून विभागीय क्रीडा संकुल बांधकामाचा प्रारंभ झाला. सात-आठ वर्षांत 17 कोटी खर्चुन 76 टक्के कामे झाल्याचा दावा संबंधितांकडून केला जात आहे. वास्तविक 30 टक्के सुद्धा काम झाले नसल्याचा दावा राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने करण्यात आला आहे. क्रीडा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून याबाबत दखल न घेतल्याने राष्ट्रवादी क्रीडा सेलने हे आंदोलन केले. जनतेकडून घेण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या टॅक्समधून विभागीय क्रीडा संकुलासारखे प्रकल्प राबविले जातात. अशा लोकोपयोगी प्रकल्पात पैशाचा अपव्यय करणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांची चौकशी करून  त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे यावेळी करण्यात आली. आंदोलनात आर. के. पोवार, राजेश लाटकर, क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे, अनिल घाटगे, संजय पाटील, दिनकर कांबळे, जाहिदा मुजावर आदींनी सहभाग घेतला.