Thu, Mar 21, 2019 11:21होमपेज › Kolhapur › विभागीय आयुक्‍तांकडून क्रीडा संकुलप्रश्‍नी झाडाझडती

विभागीय आयुक्‍तांकडून क्रीडा संकुलप्रश्‍नी झाडाझडती

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:19PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

टेनिस संकुलाची स्वच्छता का होत नाही?, स्विमिंग टँकमध्ये मिसळणार्‍या सांडपाण्याचा बंदोबस्त अद्याप का झाला नाही?, रनिंग ट्रॅकची दुरवस्था का झाली आहे?, शूटिंग रेंजचे अद्याप उद्घाटन झालेले नाही, तोपर्यंत फळ्यांची मोडतोड कशी झाली?, या सर्व गोष्टींच्या देखभालीसाठी कोणाची नेमणूक केली आहे? या व अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती करत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधित विभागांतील सर्व अधिकार्‍यांना अक्षरश: झापले. 

बुधवारी सकाळी विभागीय आयुक्‍त यांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील खेळाडूंना उपयोगी अशा विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे होत आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून हे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू आहे.

लॉन टेनिस सोडले, तर इतर खेळांसाठी हे संकुल अद्याप तयार झालेले नाही. वुडन शूटिंग रेंज तयार असून, किरकोळ दुरुस्तीअभावी ती वापराविना पडून आहे. बास्केटबॉल व खो-खो मैदानाची काही कामे बाकी आहेत. रनिंग ट्रॅक अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही. जलतरण तलावात मिसळणार्‍या सांडपाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही. अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या विभागीय क्रीडा संकुलाची चौफेर पाहणी विभागीय आयुक्‍तांनी केली. तसेच संबंधित विविध विभागांकडून झालेल्या, सुरू असणार्‍या आणि नियोजित कामांची इत्यंभूत माहितीही घेतली. वारे वसाहतीतून येणार्‍या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या चॅनेलची माहिती अधिकार्‍यांनी दिली. संकुलाच्या पश्‍चिमेला असणार्‍या शिवकालीन विहिरीतील पाण्याच्या झर्‍यामुळे या परिसरातील पाणी हटत नसल्याचेही सांगण्यात आले. 

पाहणीवेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार, मनपाचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी,  नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, सहायक क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, राज्य  जलतरण संघटनेचे दिनकर सावंत, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, स्थानिक नगरसेवक किरण नकाते यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय माहिती विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिएटिव्हचे सुजय पित्रे व दिग्विजय मळगे, सांगलीचे वास्तुविशारद व औरंगाबादचे कंत्राटदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

...आणि अधिकारीही  निरुत्तर

म्हैसेकर यांनी टेनिस संकुल परिसराची स्वच्छता का होत नाही?, रनिंग ट्रॅकची दुरवस्था का झाली आहे?, शूटिंग रेंजचे अद्याप उद्घाटन झालेले नाही, तोपर्यंत लाकडांची मोडतोड कशी झाली?, रखडलेली कामे कधी पूर्ण होणार?, संकुलाच्या देखभालीसाठीची यंत्रणा कोठे आहे? असे प्रश्‍न उपस्थित केले. यातील काही प्रश्‍नांची उत्तरे अधिकार्‍यांना देता आली. तर काही प्रश्‍नांना ते निरुत्तर झाले.