Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : दहा वर्षात पॅचवर्कवर बारा कोटी खर्च

कोल्हापूर : दहा वर्षात पॅचवर्कवर बारा कोटी खर्च

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 19 2018 1:15AMकोल्हापूर ः सतीश सरीकर 

सुरुवातीच्या काळात कोल्हापूर महापालिका स्वतःच टेंडर काढून शहरातील रस्ते करून घ्यायची. त्यावेळी ‘खड्डे पाचवीलाच पुजलेले’ असल्यासारखी स्थिती होती. सुमारे दहा वर्षांपूवी बीओटी तत्त्वावरील रस्ते प्रकल्पांतर्गत देशातील रस्त्यांचा पहिलाच प्रयोग कोल्हापूरवर झाला. त्या रस्त्यांना उपनगरे जोडण्यासाठी नगरोत्थानमधून रस्त्यांचे जाळे विणण्याचा प्रयत्न झाला.

 रस्त्यांच्या बाबतीत कोल्हापूर आता चकाचक होणार अशी स्वप्ने पाहत असताना ती धुळीस मिळाल्याचे वास्तव शहरवासीय अनुभवत आहेत. अवघे शहर खड्डेमय झाले आहे. गेल्या दहा वर्षात महापालिका प्रशासनाने पॅचवर्कवर तब्बल पावणेबारा कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही ‘खड्ड्यांच्या साडेसातीचे ग्रहण’ सुटलेले नाही. 

सन 2008 पूर्वी रस्त्यावरील पॅचवर्कला किती निधी खर्च केला याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. रेकॉर्ड विभाग व लेखाधिकारी कार्यालयातही 2008 पूर्वीची अंदाजपत्रके नाहीत. त्यामुळे 2008 पूर्वी शहरात खड्डे नव्हते की पॅचवर्कसाठी निधीच दिलेला नव्हता, असा प्रश्‍न निर्माण होतो. 

शहरात रस्ते बांधकामाची कोट्यवधींची कामे झाली, पण गेल्या काही वर्षात पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांचे डांबर वाहून गेल्याचे शहरवासीयांनी अनुभवले आहे. त्याविषयी महापालिका सभागृहातही जोरदार चर्चा झाली होती. नगरोत्थानमधील रस्ते तर असून नसल्यासारखी स्थिती झाली आहे. त्याबरोबरच शहरातील इतर रस्त्यांची तर चाळणच झाली आहे.

पॅचवर्कवर झालेला खर्च...

2008-09 ...........1, 07, 97, 921
2009-10  ......... 1, 68, 36, 304
2010-11  ..............41, 83, 537
2011-12 .............. 97, 22, 785
2012-13 ............ 2,00,00,000
2013-14 ................63,30,351
2014-15 ................43,16,558
2015-16 ................54,89,686
2016-17 .............1,50,00,000
2017-18 ............2,50,00,000