Fri, May 29, 2020 00:05होमपेज › Kolhapur › मंत्रिमंडळाच्या विशेष तरतुदीने दारूबंदी जाहीर करा

मंत्रिमंडळाच्या विशेष तरतुदीने दारूबंदी जाहीर करा

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:07AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात दारूबंदी करा, नेर्ले, हारूगडेवाडी, भेडसगाव (ता. शाहूवाडी) या गावांतील दारू दुकाने बंद करण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत मतदान घ्या, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र दारूबंदी संघर्ष समितीच्या वतीने महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 

दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांतील महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी कॉ. गिरीष फोंडे म्हणाले, संघर्ष समितीच्या वतीने गेली दहा वर्षे जिल्ह्यातील महिला गावोगावी दारूबंदीसाठी धडपडत आहेत; पण असंवेदनशील शासनामुळे या प्रश्‍नात महिलांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता मोर्चा आणि गावबंद करण्याची वेळ महिलांवर आली आहे. 

जिल्ह्यात 44 गावांत दारूबंदी करण्यात महिलांना यश आले आहे. नेर्ले (ता. शाहूवाडी) या गावांतील दारूचे दुकान बंद करण्यासाठी 19 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. पण शासकीय अधिकार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात आली, त्यामुळे तेथे दारूबंदी होऊ शकली नाही. 

नेर्ले गावात नव्याने मतदानाची प्रक्रिया राबवा. ज्या ज्या गावात दारूबंदी झाली आहे. त्या गावात अवैध दारू फोफावलेली आहे, अशा ठिकाणी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना तडीपार करावे. गावागावांत व्यसनमुक्‍ती केंद्राची स्थापना करावी, दारूबंदी मतदानामध्ये सर्वसाधारण बहुमताच्या विजयाची तरतूद करावी, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. कॉ. फोंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात, स्वाती क्षीरसागर, संदीप जामदार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.