Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Kolhapur › संघटित टोळ्यांसह सावकारांना ‘मोका’ लावा

संघटित टोळ्यांसह सावकारांना ‘मोका’ लावा

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 दहशतीच्या बळावर गुंडागर्दी करून समाजात अस्थिरता माजविणारे समाजकंटक व गोरगरिबांची पिळवणूक करणार्‍या सावकारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाईचा जबर बडगा उगारण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाचही पोलिस अधीक्षकांच्या बैठकीत दिले. सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी पोलिस यंत्रणेंतर्गत घटकांनी पुढाकार घ्यावा, गावा-गावांत शांतता समित्यांच्या बैठका घेऊन भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची अधिकार्‍यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षकांची विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक झाली. चार तास झालेल्या बैठकीत पाचही जिल्ह्यांतील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, सुहेल शर्मा (सांगली), संदीप पाटील (सातारा), सुवेझ हक (पुणे ग्रामीण), विरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण), प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पवन बनसोड, उपअधीक्षक भारतकुमार राणे आदी उपस्थित होते.

बैठकीतील चर्चेची माहिती देताना नांगरे-पाटील म्हणाले, भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. परिक्षेत्रांतर्गत काही ठिकाणी तणाव निर्माण झाला असली तरी सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशा घटनांची पुनर्रावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यात याव्यात, अशा सूचनाही दिल्या. 

समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या टोळ्यांसह सावकाराविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वर्षभरात अनेक टोळ्यांविरुद्ध ‘मोका’ कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘मोका’ कारवाईशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कारवाईचे अधिक गतीने प्रस्ताव दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात वाटमारीचे प्रकार वाढले आहेत. गुन्ह्यातील सराईतांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. युवती छेडछाडीच्या घटनामध्ये अजूनही वाढ आहे. या घटना वेळीच रोखण्यात आल्या नाहीत तर पथकप्रमुखांना जबाबदार धरले जाईल. पोलिस कल्याण योजनेंतर्गत नावीण्यपूर्ण योजना राबविण्याच्या सूचनाही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी पोलिस अधीक्षकांना दिल्या.