होमपेज › Kolhapur › मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोला

मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोला

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 07 2018 11:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी

किशोर वय म्हणजे बालपणातून अलगद तारुण्यांकडे जाणारे वय. याच वयात स्त्रीला मातृत्वाची लाभ देणारी मासिक पाळी सुरू होत असल्याने शारीरिक व मानसिक बदलामुळे मुलींच्या मनात भीती दाटते. या बदलाविषयी समाजात आजही खुलेपणाने बोलले जात नसल्याने अत्याचाराच्या घटनांची सुरुवातही याच वयापासून होते. त्यामुळे शारीरिक आरोग्यासाठी समतोल आहाराच्या जोडीनेच मानसिक बदलावर या मुलींशी पालकांनी संवाद वाढवावा, असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञ व दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब वेल्फेअर कमिटी  सदस्या डॉ. रूपा कुलकर्णी यांनी केले.

 दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फौंडेशनतर्फे शिवाजी पेठ येथील पी. बी. साळुंखे कन्या विद्यामंदिरात महिला सबलीकरणांतर्गत आयोजित ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मनपा प्राथमिक शिक्षण सभापती वनिता देठे, शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई, मुख्याध्यापिका गीता काळे आदी उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण  केलेल्या विद्यार्थिनींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात संभाजी विद्यालय, संभाजीनगर, द्वारकानाथ कपूर विद्यालय, गंजीमाळ, सानेगुरुजी ऑक्ट्राय नाका विद्यालय, दत्ताजीराव माने विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय या शाळांतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. 

किशोरवयीन मुलींशी संवाद साधताना डॉ. रूपा कुलकर्णी म्हणाल्या, मासिक पाळीशी संबंधित तक्रारीवर प्रथम आई आणि डॉक्टरांशी संवाद साधावा. या वयात होणार्‍या बदलांमुळे मनात भीती निर्माण होते, अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन यासारखे आजारही जडू शकतात. स्वच्छतेसह स्वत:ची काळजी मुलींनी कटाक्षाने घ्यायला हवी.यावेळी मनपा शिक्षण सभापती वनिता देठे यांनी या उपक्रमामुळे मुलींच्या मानसिक व शारीरिक विकासाबरोबरच बौद्धिक विकासाला चालना मिळाली आहे. असे उपक्रम राबवल्याबद्दल दैनिक ‘पुढारी’चे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणार्थी  तेजस्विनी बुचडे, रेश्मा मोरे म्हणाल्या, आत्मसंरक्षणाचे हे प्रशिक्षण आयुष्यभर उपयोगी पडेल. भविष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे धाडस या उपक्रमाने निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपक्रमांत सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिंनी उपस्थित होत्या. 

Tags : Kolhapur, Speak, openly, menstrual period