होमपेज › Kolhapur › वाहतूक कोंडीने घेतला हसर्‍या ‘सोनू’चा बळी

वाहतूक कोंडीने घेतला हसर्‍या ‘सोनू’चा बळी

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:12AMकोल्हापूर : विजय पाटील

अहो वाट सोडा ओ... माझं पोरगं अत्यवस्थ आहे. अ‍ॅम्ब्युलन्सला तरी पुढे जावू द्या.. अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता.. पण वाहतूक कोंडी जागची हलत नव्हती.. गर्दीतून वाट काढत कशीबशी अ‍ॅम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दारात पोहोचली.. पोराचा चेहरा बघत बापाची तळमळ आणि तगमग सुरू होती... घाईने बापाने मांडीवर पहुडलेल्या लाडक्या सोनूला हाक मारली.. हाकेला हलकासा प्रतिसाद देत सोनूने वडिलांच्या कुशीतच मान टाकली. ती कायमचीच. हसर्‍या चेहर्‍याचा सोनू क्षणार्धात मृत्यूच्या कराल दाढेत गेला. क्षणभरात बापाचं काळीजच फाटलं. एक-दोन मिनिटे अगोदर हॉस्पिटलला पोहोचलो असतो, तर सोनू वाचला असता, असे त्यांना वाटले. वेळ गेली होती. निरागस चिमुकल्याचा ट्रॅफिकने पर्यायाने अ‍ॅम्ब्युलन्सला वाट न सोडल्याने बळी घेतला होता.

किमान यापुढे तरी असे दुर्दैव दुसर्‍या कुणाच्याही वाटेला येऊ नये, यासाठी काळजावर दगड ठेवून सोनूच्या वडिलांनी सोमवारी (दि. 7) अ‍ॅम्ब्युलन्सला वाट सोडा.. पुन्हा कुणाचेही आई-बाप पोरके करू नका, असे सोशल मीडियावरून आवाहन केले. हे आवाहन वाचून अनेकांच्या काळजात धस्स झाले. ओरडून, ओरडून थकलेल्या बापाची अशी हृदयद्रावक कहाणी ऐकून अनेकांचे मन द्रवले. सोनूबाबत दुर्दैवी घटना नुकतीच घडली; पण आपल्या मुलाला आपण ट्रॅफिकमुळे हातोहात गमावले आहे. दुसर्‍यांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी या पित्याने कोल्हापूरकरांना वाहतुकीचे नियम पाळा, असे कळकळीचे आवाहन केले आहे.

करियाप्पा शिवाजी कारदगे हे मूळचे गडहिंग्लजचे. कामानिमित्त इलेक्ट्रिक मेंटेनन्सचे ते आठ-दहा वर्षे पुण्यातच राहून काम राहतात.  करियप्पा आणि त्यांची पत्नी गंगुताई यांना पाच वर्षांची केतकी नावाची मुलगी आहे, तर तीन वर्षांचा कार्तिक हा मुलगा होता. लाडाने कार्तिकला ते सोनूच म्हणत. दोघेही काम करत असल्याने सोनू गडहिंग्लजला काही महिन्यांपासून आजीजवळच राहत होता. आजी गंगाबाई यांनीही नातवाला चांगले सांभाळले होते; पण अपचन झाल्याने काही दिवसांपासून सोनूला किरकोळ स्वरूपाची पोटदुखी सुरू होती.

चांगल्या बालरोगतज्ज्ञाला दाखवून सोनूला बरे करावे, या उद्देशाने करियाप्पा कोल्हापूरला आले. पुण्याला त्याच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने ते 10 एप्रिलला कार्तिकला घेऊन पुण्याला निघाले; पण पेठनाक्यानजीक कार्तिकला पोटदुखी सुरू झाली. त्यामुळे हायवे अ‍ॅम्ब्युलन्सने ते पुन्हा कोल्हापुरात रंकाळ्यानजीक एका खासगी हॉस्पिटलला उपचारासाठी येत होते; पण रंकाळा रोडवरील ट्रॅफिकने अ‍ॅम्ब्युलन्सला पोहोचण्यास खूप उशिर झाला आणि बाबा, मला काय होणार नाही ना, असे स्मितहास्य करून बोलणारा सोनू बापाच्या मांडीवरच निपचित पडला.