Tue, Jul 23, 2019 04:58होमपेज › Kolhapur › सोनाबाई साठेंना कोण ओळखत नाही?

सोनाबाई साठेंना कोण ओळखत नाही?

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:33PMकोल्हापूर : विजय पाटील 

सोनाबाई साठे सत्तरीच्या. शड्डू मारणारा निधड्या छातीचा पैलवानही जिथं राहणार नाही अशा तुकाबाईच्या पठारावर त्या पांढर्‍या मातीच्या घरात एकल्याच राहतात. कागल तालुक्यातील चिमगावपासून हे निर्मनुष्य पठार तीन किलोमीटर इतकं भरतं. इथं रानटी जनावरं दिसतील, पण माणूस नजरेला पडणार नाही. कालपरवापर्यंत या सोनाबाईंना गावातलेही फारसे ओळखत नव्हते; पण आता मात्र जादूची कांडी फिरावी तशी सोनाबाई नावाची चर्चा कागलातल्या प्रत्येक गावात आणि घराघरांत सुरू आहे. सोनाबाईंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या आजीबाईंना भेटण्यासाठी त्यांच्या डोंगरातल्या घरात माणसांची तोबा रीघ सुरू झाली. 

सोनाबाईंना स्वत:चे शेत नाही. त्या दुसर्‍यांच्या शेतात रोजगार करतात. त्या एकट्याच आहेत; पण सोनाबाई या खमकी बाई म्हणावी अशा धाडसी आहेत. डोंगरावर त्यांनी सोळा शेळ्या,  सहा म्हशी पाळल्या आहेत. जनावरांना लागणारा वैरण-चारा त्या एकट्याच वाहतात. कोंबडं आरवायच्या आधी म्हणजे पहाटे चारच्या आधी त्यांचा दिवस सुरू होतो. काळ्याकुट्ट अंधारातून चालत चिमगावच्या डेअरीत रोज  दूध घालण्यासाठी जातात. 

हे सगळं खरं! पण या सोनाबाईंची कहाणी यापुढची आहे. त्या कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्या म्हणतात, मी अंगुठाबहाद्दर आहे; पण त्यांच्याकडे आसपासच्या घडामोडींचं नेमकं विश्‍लेषण करण्याचं कौशल्य आहे. कागल म्हणाल तर ते राजकीय विद्यापीठ. कागलच्या राजकारणाकडे राज्याचं लक्ष असते. 

आता कागलातल्या झाडून सगळ्या राजकीय नेत्याचं सोनाबाईंनी लक्ष वेधलं. याचं कारणही मजेशीर घडलं. सोनाबाईंना कुणीतरी कागलच्या राजकारणाबद्दल मतं विचारलं. मग सोनाबाईंची तोफ धडाडली. गावरान भाषेत त्यांनी राजकारणाची गणिते मांडली. कुणीतरी हा व्हिडीओ बनवण्यासाठीच त्यांना बोलतं केलं हे खरं आहे; पण सोनाबाई बिनधास्त बोलल्या. 

ही त्यांची वैयक्तिक राजकीय मते असली तरी त्यांनी ती बिनधास्त मांडली आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि राजकीय पक्ष व नेत्यांनी सोनाबाईंना गटातटांचे लेबल लावणे सुरु केले. मुश्रीफ गटांचे कार्यकर्ते म्हणताहेत हा व्हीडीओ घाटगे गटाने बनवलाय. घाटगे गट सांगतोय की हा व्हिडीओ मुश्रीफ गटाचीच खेळी आहे. तर काहीजण म्हणताहेत हे मंडलिक गटाचं काम आहे. तर काहींचं मत आहे की  राजकारणात उलथापालथ व्हावी म्हणून कुणीतरी हे मुद्दाम केलय.

पण प्रत्यक्ष सोनाबाईंशी बोलल्यावर समजतं की या आजी स्वभावाने भाबड्या आहेत. त्या म्हणतात, मी वारकरी आहे. मला जे पटतं  ते मी कायम बोलतो. मला सगळं नेतं सारखं. निवडणुकीचा आणि माझा काय सबंध नाय. मला कुणीतरी विचारलं. मी बोलत सुटलो. मग माझं बोलणं कुणीतरी टिव्हीवर टाकलं असं म्हणतात. मला ते काय माहित नाही. मी बोललो म्हणून कुठं आभाळ कोसळणार हाय. 
सोनाबाई सहज बोलल्या आणि कागल तालुक्याच्या राजकारणात चर्चेला ऊत आला. सोनाबाईंचा बोलवता धनी कोण? सोनाबाईं या गटाच्या? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. पण सोनाबाई ही एक खमकी महिला आहे. ती बोलली हे तीचं वैयक्तिक मत आहे. हे बोलणं समजावून घेतलं पाहिजे. कारण हा लोकशाही व्यवस्थेचाच एक चांगला भाग आहे.