Fri, Mar 22, 2019 05:59
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये, धोका मात्र सेनेला 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये, धोका मात्र सेनेला 

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 12:49AMकोल्हापूर : रणधीर पाटील

करवीर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा भाजपला कितपत फायदा होईल, हे सांगता येत नाही; पण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. करवीरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीची रसद शिवसेनेला मिळत होती, हे उघड गुपित आहे. त्या मदतीमुळे काट्याच्या लढतीत दोनवेळा चंद्रदीप नरके यांना विधानसभेचे मैदान मारणे शक्य झाले. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार असल्याने आ. नरके मतांची पोकळी कशी भरून काढणार? हा प्रश्‍न आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकाकी

माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरे नेतृत्व तयार होऊ शकले नाही. त्यामुळे कधीकाळी कार्यकर्त्यांची भक्‍कम फळी असणारी राष्ट्रवादी काँग्रेस विस्कळीत झाली. लोकसभेपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोयीची भूमिका घेऊन स्वत:चे अस्तित्व टिकवावे लागले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उरलीसुरली रसद चंद्रदीप नरके यांना मिळत होती. आता हीच रसद भाजपला मिळणार असल्याने भाजपची ताकद काही प्रमाणात वाढणार असली, तरी त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. 

नेत्यांनी केले कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष

राष्ट्रवादीतील जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्येच गेल्या चार वर्षांपासून संदोपसुंदी सुरू आहे. आ. हसन मुश्रीफ आणि खा. धनंजय महाडीक यांच्यातील दुरावा प्रचंड वाढला आहे. दोन्हीही नेत्यांनी जिल्ह्यातील राजकारणात कधी काँग्रेसशी तर कधी भाजपशी संधान साधून साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविल्या. पण राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसविण्याचा फारसा प्रयत्न केला गेला नाही. करवीर, शाहूवाडी, गगनबावडा यासारख्या तालुक्यात राष्ट्रवादीला कोणी वालीच उरला नाही. 

दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील नेत्यांचा स्थानिक राजकारणात अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही कार्यकर्त्यांनी स्वबळावरच लढल्या.  त्यामध्ये पराभव पत्करावा लागला. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ आली. नेतृत्वाचा अभाव आणि पक्षांतर्गंत दूर्लक्षामुळेच काही कार्यकर्त्यांनी आता भाजपचा पर्याय निवडला आहे. 

URL : NCP, activists, decide, BJP, kolhapur news