Thu, Apr 25, 2019 06:01होमपेज › Kolhapur › भारत पाटणकर यांना अंबाबाई मंदिरात गाभारा प्रवेश नाकारला

भारत पाटणकर यांना अंबाबाई मंदिरात गाभारा प्रवेश नाकारला

Published On: Dec 15 2017 1:48PM | Last Updated: Dec 15 2017 1:48PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर यांना आज, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून पुजाऱ्यांनी अडविले. सोवळे नेसले नसल्यामुळे त्यांना पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला आहे. याबाबत पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सरकारने या हिवाळी अधिवेशनातच पुजाऱ्यांना मंदिरातून हटविण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पाटणकर यांनी यावेळी दिला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाटणकर आज, काही निवडक कार्यकर्त्यांसह अंबाबाई मंदिरात गेले होते. गाभाऱ्यात प्रवेश करण्या संदर्भात त्यांनी देवस्थान समितीकडून परवानगीही घेतली होती. मात्र, गाभाऱ्याबाहेर त्यांना पुजाऱ्यांनी अडविले. 'येथे सोवळे नेसून गाभाऱ्यात जाण्याची परंपरा आहे. तुम्हाला जाता येणार नाही,' असे सांगून पुजाऱ्यांनी त्यांना अडविले. यावर पाटणकर यांनी, 'संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरांमध्ये देवाचा चरणस्पर्श करता येतो. येथेच का दिला जात नाही. सोवळे नेसणे याचा अर्थ काय? शुद्ध असणे, असाच असेल, तर आम्ही शुद्ध आहोत. आम्हाला प्रवेश करू द्या.' अशी मागणी केली. मात्र, पुजाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. 

यावर पाटणकर यांनी मंदिरातून बाहेर येऊन, पत्रकारांशी संवाद साधला. येत्या अधिवेशनात अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटविण्याबाबत निर्णय घेतला नाही, तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटणकर यांनी यावेळी दिला.