होमपेज › Kolhapur › जैविक शेतीस सर्वोच्च प्राधान्य

जैविक शेतीस सर्वोच्च प्राधान्य

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 11 2018 11:44PMउजळाईवाडी : प्रतिनिधी

केंद्र सरकारकडून खेड्यातील जीवन समृद्ध करण्यासाठी सेंद्रीय शेती समृद्ध करून उत्पादन वाढीसाठी जैविक शेतीला प्राधान्य दिले आहे. कणेरी मठात जैविक शेती, पशुपालनाबरोबरच कारागिरीच्या दृष्टीने होत असलेले प्रयोग आणि संशोधन अतिशय महत्त्वाचे असून याचे देशभर अनुकरण व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज यांनी केले. 

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठामध्ये आयोजित केलेल्या 5 दिवसीय सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठ व महाकुंभ कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, राजकोट येथील स्वामी नारायण संस्थांनचे स्वामी श्री. त्यागवल्लभदास, रायबरेली संस्थांनचे बडेराजा कौशलेंद्रसिंह, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्रीमती अंजली चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जगाने यंत्राच्या आधारे केलेल्या विकासाच्या अनुकरणाने खेडी ओस पडून बेरोजगारीची पौज निर्माण झाली असून आता आपल्याला अंगभूत कौशल्य दाखविण्याची गरज आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाने भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून जैविक शेती अशा अनेकविध उपक्रमातून विशेषत: शेतकर्‍यांना नवी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, स्वामी नारायण संस्थांनचे स्वामी श्री त्यागवल्लभदास, रायबरेली संस्थांनचे बडेराजा श्री कौशलेंद्रसिंह आदींनी भाषणे झाली. सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठाचे उद्घाटन राजकोट येथील स्वामी नारायण संस्थांनचे स्वामी श्री त्यागवल्लभदास यांच्या हस्ते करण्यात आले. तर खाद्य महोत्सवाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला शोभा यात्रा काढण्यात आली. काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी प्रास्ताविकात कारागीर महाकुंभ सोहळ्याची संकल्पना विषद केली. समारंभास के. डी. राव, आर. डी. शिंदे, बसंतसिंग, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अण्णासाहेब जोल्ले आदी उपस्थित होते.