होमपेज › Kolhapur › सीपीआरचे ६ डॉक्टर ‘रडार’वर

सीपीआरचे ६ डॉक्टर ‘रडार’वर

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 11:04PMकोल्हापूर : सुनील कदम

सीपीआर रुग्णालयातील काही डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिस करीत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन या तक्रारींची शहानिशा केली असता, सीपीआरचे सहा डॉक्टर खासगी वैद्यकीय प्रॅक्टिस करताना रंगेहाथ आढळून आलेले आहेत. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली असून, संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्याला कायद्याने बंदी आहे. असे असतानाही येथील काही डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याच्या तक्रारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे शहरातील काही समाजसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी कोल्हापुरात भेट देऊन संबंधित अधिकारी खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची खातरजमा करून घेतली. या अधिकार्‍यांनी खासगी प्रॅक्टिस करीत असलेल्या संबंधित सहा डॉक्टरांच्या खासगी रुग्णालयात बोगस रुग्ण म्हणून जाऊन उपचारही करून घेतले. त्यानंतर या अधिकार्‍यांनी शासकीय रुग्णालयातील हे अधिकारी खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचा अहवाल शासनाला सादर केला.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार डॉ. रामानंद यांनी प्राथमिक अहवाल शासनाला पाठविलेला आहे. मात्र, या प्राथमिक अहवालानुसार संबंधित डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसबाबतची सत्य माहिती देण्याचे टाळण्यात आल्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना संशय आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू केली आहे.

सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसबद्दल आजपर्यंत अनेकवेळा तक्रारी झालेल्या होत्या. मात्र, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या न्यायाने प्रत्येकवेळी वरिष्ठांकडून या बाबीवर पांघरूण टाकण्याचे उद्योग होत होते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वत:च या प्रकाराची खातरजमा करून घेतल्यामुळे येथील डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसचा आणि त्यावर पांघरूण टाकण्याच्या प्रकाराचा पर्दाफाश झालेला आहे.

Tags : Kolhapur,  Six, Doctor, CPR,  Radar