Thu, Mar 21, 2019 23:25
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › एकच मिशन...महापालिका शाळेत शिक्षण

एकच मिशन...महापालिका शाळेत शिक्षण

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी

एकच मिशन...महापालिका शाळेत शिक्षण, लय भारी, लय भारी मनपा शाळा लयभारी.. अशा घोषणा देत महापालिका शाळेतील शिक्षक व कर्मचार्‍यांनी पटसंख्या वाढीसाठी शहरातून जनजागृती दुचाकी रॅली काढली. 

मनपा शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा शाळांकडे बघण्याचा द‍ृष्टीकोन बदलणे व शाळेतील वैशिष्ट्यांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी मनपा शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मंगळवारी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढली. जवाहरनगर, राजोपाद्येनगर, फुलेवाडी, बावडा व टेंबलाईवाडी या पाच विभागांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  दुचाकीवरून मुख्य रॅलीसाठी दसरा चौक येथे एकत्रित जमले. मुख्य रॅलीचे उद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाले. शिक्षकांनी मनपा शाळा लयभारी पथनाट्याचे सादरीकरण केले. दसरा चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला.

आयोध्या टॉकीज, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, सीपीआर रोड मार्गे दसरा चौक येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत मनपा शाळांचे फलक, डोक्यावर टोप्या घातलेल्या शिक्षकांनी लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सभागृह नेता दिलीप पोवार, प्रभारी प्रशासनाधिकारी एस. के. यादव, शोभा कवाळे, अशोक जाधव, सुरमंजिरी लाटकर, सहायक कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील, लेखापाल बाबा साळोखे, शैक्षणिक पर्यवेक्षक  विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्यासह मनपा प्राथमिक शिक्षक समिती, मनपा प्राथमिक शिक्षक संघ, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शहर शाखा यांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.