Thu, Apr 25, 2019 15:37होमपेज › Kolhapur › कल्याणकारी मंडळातून चांदी कारागीरच वगळले!

कल्याणकारी मंडळातून चांदी कारागीरच वगळले!

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:11AMहुपरी : अमजद नदाफ

शासनाने यंत्रमाग, बिडी व बांधकाम कामगारांच्या बरोबरच 123 उद्योगांतील कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा नुकतीच केली आहे. मात्र, यामध्ये चांदीच्या दागिन्यांना आपल्या कुशल कलाकुसरीने संपूर्ण देशात झळकवणार्‍या हुपरी परिसरातील हजारो चांदी कारगिरांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. हुपरीसह 10 गावांतील हजारो चांदी कारागीर यापासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने कल्याणकारी मंडळात चांदी कारागिरांचाही समावेश करून त्यांना न्याय देण्याची गरज आहे. 

शासनाने 123 असंघटित कामगार गटांचा विचार करून अनेक क्षेत्रातील कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याद्वारे त्यांना विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. 15 ऑगस्टपासून अशा कामगारांची नोंदणी होणार आहे. तत्पूर्वी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात  चांदी कामगारांचा समावेश करण्याचा निर्णय झाल्यास येथील हजारो चांदी कारागिरांना त्याचा लाभ होणार आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी हुपरी नगरपालिका स्थापन करण्यासाठी जसा पुढाकार घेतला त्याप्रमाणे या प्रश्‍नावर आवाज उठवल्यास ते शक्य होणार आहे, अशी हुपरीसह 7 गावांतील कारागिरांची भावना आहे.

हुपरी परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून चांदी व्यवसाय सुरू आहे. हस्तकलेत मोडणार्‍या या उद्योगाला कुशल कारागिरांनी सातासमुद्रापार पोहोचवले. मात्र, हाच कामगार वर्ग अद्याप शासकीय योजनांपासून वंचित आहे. हुपरी परिसरात घराघरांत हजारो कारागीर आपली कलाकुसर दाखवत आहेत. चांदी कारागीर व धडी उत्पादक यांच्या अपार कष्टातून हुपरीचा चांदी उद्योग बहरला आहे. हस्तकला व्यवसाय असतानाही केंद्र व राज्य शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी शासनाने याकडे लक्ष घातले होते. मात्र, सत्तांतरानंतर त्याकडे पुन्हा दुर्लक्ष झाले. याभागातील राजकीय मंडळींनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कारागिरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आ. हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आदींनी या प्रश्‍नी लक्ष घालण्याची गरज आहे.
सध्या बांधकाम कामगारांसाठी असणार्‍या कल्याणकारी मंडळामध्ये कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी भरघोस निधीची तरतूद आहे. विविध प्रकारच्या पेन्शन योजनांसह लाखो रुपयांचा अपघात विमाही देण्यात येतो. एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्‍या कुटुंबातील त्या मुलीच्या नावे 1 लाख रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. काम करताना अपंगतत्व आल्यास त्यास 2 लाख रुपयांचा अपघाती विमाही देण्यात येतो.

चांदी कारागिरांवर अन्याय का? 
हुपरीसह परिसरात हजारो चांदी कारागीर आहेत. सध्या चांदी उद्योगात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. महत्त्वाचे चांदी दागिने निर्मितीचे कामही महिला वर्ग करीत आहे. अनेक वर्षांपासून चांदी काम केल्यामुळे कारागिरांना कंबरदुखी, नजर कमी येणे यासारखे शारीरिक त्रास जाणवतात. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी यंत्रमाग कामगार, बिडी उद्योगातील कामगार यांचा कल्याणकारी महामंडळात समावेश होणार आहे. त्याच धर्तीवर हुपरी परिसरातील चांदी कारागिरांचाही समावेश होणे गरजेचे आहे.